रयतेचा राजा शिवाजी राजा
रयतेचा राजा शिवाजी राजा (1630 - 1680) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची मोहिनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आहे. असे काय कारण होते की ज्यामुळे या देशांत अनेक राजे, महाराजे, सम्राट, शहेनशहा होऊन गेले परंतू शिवाजीराजांबद्दलची आपुलकी व आदर आज 340 वर्षानंतरही जनतेच्या मनात कायम टिकून आहे. शिवाजी महाराजांचे आयुष्य अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. त्या घटनांबद्दल सर्वच जण भारावून बोलतात. परंतू त्या घटनांची जंत्री सांगणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा जीवनपट उलगडणे असे नव्हे. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, पन्हाळगडाच्या वेढ्यातून योजनाबद्ध धाडसाने निसटणे, आग्राच्या कैदेतून शिताफीने सुटका, कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला माते समान मानणे, महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडणे इत्यादी काही घटनांच्या आधारे शिवाजी महाराजांची थोरवी गायली जाते. शिवाजीराजांना अवघे 50 वर्षांचे आयुष्य लाभले त्यांतील वरील प्रमुख घटनांचा कालखंड तपासला तर सर्व घटना 1657 ते 1666 या साधारण 10 वर्षांच्या काळात घडलेल्या आहेत. मात्र त्यांचा थोरपणा या पलीकडचा आ...