टाईमलाईन: अठराव्या शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा
टाईमलाईन: अठराव्या शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा
या लेखाचा उद्देश अठराव्या शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचा समग्र इतिहास सांगणे हा नसून त्या इतिहासाची संक्षीप्त टाइमलाइन ज्ञात करणे हा आहे. या कालक्रमानुसार नोंदलेल्या टीपा आहेत. अठराव्या शतकात जन्मलेल्या मोजक्या 37 समाजसुधारकांच्या कार्याची नोंद घेतली आहे व त्याची तत्कालीन परिस्थितीशी सुसंगतता समजण्यासाठी त्याकाळाच्या टाईमलाईनची जोड दिली आहे. कार्ल मार्क्सने भारताचा अभ्यास करताना टाईमलाईनची पद्धत वापरली होती. महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या प्रवाहाची, देशातील समाज सुधारणेच्या प्रवाहाशी व जागतिक बदलाशी असलेली संगती कळावी म्हणून काही ठिकाणी महाराष्ट्रा बाहेरील समाज सुधारकांच्या कार्याचा व जागतीक इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या देशाबाहेरील व्यक्तींच्या कार्याचा संदर्भ घेतला आहे. कालक्रम टीपा जन्मनोंदीनुसार घेतल्या आहेत. पण जर एखाद्या थोर व्यक्तींच्या जन्मानंतर लगोलगच्या काही वर्षात एखादी ठळक घटना घडली असेल तर त्या घटनेची नोंदी प्रथम घेतली आहे. बहुतेक सर्व नोंदी सन 1800 ते 1899 या कालखंडातील आहेत. चाळीस वर्षापूर्वी या कालखंडाला पारंपारीक पध्दतीनुसार अठरावे शतक म्हणून सर्रास संबोधले जायचे. मात्र सन 2000 नंतर गणिती कालगणनेनुसार एकोणिसावे शतक म्हणून म्हटले जाऊ लागले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (सन 1707) केंद्रीय मुघल सत्ता दुबळी झाली होती. दिल्लीतील केंद्रीय सत्तेवर महाराष्ट्रातील पेशव्यांचे व मराठ्यांचे वर्चस्व वाढले होते. दिल्लीचा सत्ताधीश कोण असावा हे मराठे ठरवू लागले होते. बहादुरशहाचे मानधन महादजी शिंदे ठरवून देत असत व हे मानधन वाढवण्यासाठी बहादुरशहाला महादजींची मनधरणी करावी लागे. मराठे किंगमेकरच्या भुमीकेत तेंव्हापासून होते व हा मोठेपणा पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि आजही डोक वर काढतो. महाराष्ट्रासह इंदूर, ग्वाल्हेर, बडोदा अशा अनेक ठिकाणी मराठा सरदार सत्तेवर होते. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अशा रचना त्यातूनच स्फुरतात. देशातील स्थानिक राजे - महाराजे हे मुघल सत्तेला आव्हान देत होते. सारा भरण्यास टाळाटाळ करीत होते. औरंगजेबाच्या दक्षिणेतील स्वारीने विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच्या युद्धाने व त्यानंतर मराठ्यांसोबत झालेल्या लढाईत साम्राज्याचा खजिना रिता झाला होता. आसामपासून अफगाणिस्तान पर्यंत पसरलेले अवाढव्य मुघल साम्राज्य दिल्लीतून सांभाळणे अवघड झाले होते. राज्यकारभाराची घडी विस्कटली होती.
मोगल सत्तेच्या खिळखिळे होण्यामागे अनेक कारणे होती. त्यापैकी दोन महत्त्वाची कारणे म्हणजे, मुघल सत्ता वंशपरंपरागत वारसाहक्क मानत नव्हती आणि भारतात नव्याने शिरकाव करणाऱ्या भांडवलशाहीची आरंभीची पावले मुघल सत्ताधीश ओळखू शकले नाहीत. प्रत्येक शहेनशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसात आपापसात लढाया होत व त्यापैकी कोणा एकाचे शिरकाण होऊन नवीन सत्ताधीश सत्तेवर येत असे आणि आलेल्या सत्ताधीशाचा, आपले साम्राज्य मजबूत करण्यासाठी उत्पादक शक्तींचा विकास करणे हे अव्वलदर्जाचे आर्थिक कार्यसोडून, त्या ऐवजी अंतर्गत शत्रूचा बिमोड करणे यातच त्याचा वेळ जात असे. कृषीक्षेत्राची वाढ हाच त्यावेळेसच्या GDP वाढीचा मापदंड राहिला.
भारतात इस्लाम धर्माचा उदय सातव्या शतकात झाला. पहिली मशीद इसवी सन 629 साली बांधली गेली. भारतात आलेल्या इस्लाम धर्माला स्थानिक भारतीय लोकांकडून फार मोठा विरोध झाला नव्हता. अस्पृश्यता न पाळणारा, सर्वांसोबत एका ताटात समूहाने जेवणारा, सर्वांसोबत रांगेत नमाज पडणारा सत्ताधीश, इथल्या जातींच्या बजबजपुरीत राहणाऱ्या समाजाला भावला. पण असे असले तरी खुद्द अकबराच्या दरबारात हिंदूंचे प्रमाण कमी होते. आणि राज्यकारभाराची भाषा हिंदी, संस्कृत किंवा उर्दू नव्हे तर पर्शियन होती. इंग्रजीला आज जे स्थान आहे ते स्थान तेव्हा पर्शियन भाषेला होते. त्यामुळे ब्राह्मणांसह हिंदू धर्मामधील उच्चवर्णीय समाजांना पर्शियन अवगत असणे भाग होते. संस्कृत आणि पर्शियन या दोन्ही भाषा बहुजनांच्या नव्हत्या. ब्राम्हण वगळता अन्य कोणाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित या विषयातील संशोधन बंद पडले होते. अकबराला दुर्बीण माहिती होती पण त्या मागचे विज्ञान माहिती नव्हते. नवव्या शतकापर्यंत पुढारलेला भारत जातीप्रथेच्या जोखडामुळे मागास राहिला होता.
ईस्ट इंडिया कंपनीने संपूर्ण भारत त्यांच्या अधिपत्याखाली आणल्यानंतर हे चित्र बदलले. ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी भांडवलदारी कंपनी होती आणि तिने भांडवलदारी व्यवस्था भारतामध्ये रुजवण्यास आरंभ केला. नवीन भांडवलदारी उत्पादन पद्धती जुन्या सरंजामदारी उत्पादन पद्धतीपेक्षा सरस होती. राज्यकारभारातील पर्शियन भाषेचे महत्व लयाला गेले आणि इंग्रजी ही राज्यकारभाराची भाषा बनली. प्रस्तापित शिक्षित मुस्लिम कुलीन वर्गासाठी हा मोठा धक्का होता. हा वर्ग पर्शियन भाषा शिक्षित होता व पर्शियन अवगत असणे हा त्याच्यासाठी सामाजीक प्रतिष्ठेचा व वर्गीय वर्चस्वाचा मुद्दा होता. राज्यकारभाराची भाषा पर्शियन ऐवजी इंग्रजी अशी बदलल्यामुळे त्यांच्या वर्चस्वाला हादरा बसला होता. हिंदू सवर्णांना व त्यातही मुख्यत्वे ब्राह्मणांना नव्या भाषिक व्यवहाराशी जुळवून घेणे फारसे अवघड नव्हते. यापूर्वी त्यांनी पर्शियन व उर्दूला जवळ केले होते त्यामुळे इंग्रजी स्वीकारण्यासाठी त्यांना मोठी तडजोड करावी लागली नाही. भाषा बदलाचा खरा प्रश्न हा मुघल आमदानीत ठाण मांडून बसलेल्या प्रस्तापित कुलीन मुस्लिम शिक्षित वर्गाचा होता. त्यांना हा भाषेतील बदल पचविणे जड गेले. त्यातच ब्रिटिशांनी जुनी सरंजामी व्यवस्था संपूर्णपणे मोडून न काढता त्यावर भारतीय भांडवलशाहीचे कलम केले. भारतीय भांडवलशाहीचे हे दुहेरी स्वरूप नंतर भारतीय राजकारणावर व येथील सामाजिक सुधारणांवर चिरकाल छाप टाकून राहिले आहे. महान तत्वज्ञ कार्ल मार्क्स याने या काळाचे अचूक वर्णन केले आहे की, "भारतीयांच्या दैन्याला पारावार उरलेला नाही कारण ब्रिटिशांनी जुने सर्व मोडून काढले आहे आणि नव्याचा पत्ताच नाही."
ईस्ट इंडिया कंपनीच्या आमदानीत निर्माण झालेल्या नव्या हिंदू सुशिक्षित समाजाने इंग्रजी भाषेचे वर्चस्व चटकन स्वीकारले पण असे करणे एकेकाळी सत्तेच्या निकट असलेल्या जुन्या मुस्लीम प्रस्थापित वर्गाला अवघड होऊन बसले. मुस्लिम समाज, शिक्षणामध्ये व सामाजिक सुधारणांमध्ये हिंदूंच्या मागे राहण्याची जी अनेक कारणे ब्रिटीशकालीन भारतात निर्माण झाली त्यातले हे एक महत्त्वाचे कारण होते. 1835 साली इंग्रजी ही अधिकृतरीत्या राज्यकारभाराची भाषा म्हणून जाहीर केली गेली. 1857 च्या उठावामागे तत्कालीन प्रस्थापित मुस्लिमांतील राजकीय वर्चस्वाच्या अस्मितेची भावना प्रबळ ठरली होती. 1857 च्या बंडानंतर ब्रिटिशांनी वापरलेली फोडा आणि झोडा ही नीतीसुद्धा मुस्लिमांमधील सामाजीक सुधारणा आणि शिक्षणाच्या प्रसाराच्या आड येण्यास कारणीभूत होती. हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले तर ब्रिटिश सत्तेला धक्का पोचू शकतो हे ब्रिटिशांच्या लक्षात आले होते. त्यामुळे एका बाजूने मुस्लिम धर्मांधाना चुचकारताना मुस्लिम समाज, शिक्षण आणि नोकऱ्यांतून डावलला कसा जाईल ते ब्रिटिशांनी पाहिले. त्याच बरोबर दिखाऊ प्रतिष्ठा आड येत असल्याने अनेक मुस्लिम उमरावांनी सामान्य मुलांसोबत आपल्या मुलांना शाळेत पाठवणे टाळले. काही हिंदू उमरावांनी देखील याचे अनुकरण केले परिणामी त्यांची मुले मागे राहिली. मात्र शहरात रहाणाऱ्या अनेक मुस्लिम व हिंदूनी सामुदायिक शिक्षण व्यवस्थेचा स्वीकार केला. भारतातील जातीय दंगलींचा इतिहास 1857 नंतर सुरू होतो. 1857 पूर्वी हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दंगल घडल्याचे उदाहरण सापडत नाही. भारतातील पहिली हिंदू मुस्लिम दंगल 1882 साली सेलम येथे एका मशिदीच्या जागेवरून झाली. भारतात हिंदू विरूध्द मुस्लिम असा वाद, हिंदू किंवा मुस्लिम दोन्ही राजांच्या कारकिर्दीत नव्हता तो ब्रिटिश साम्राज्यशाहीने पध्दतशीर खतपाणी घालून सुरू केला.
ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतातील धार्मिक शिक्षणाचे स्तोम लयाला जाऊन सर्व जाती धर्मासाठी एकत्र सामूहिक शिक्षण मिळण्याची पद्धत, जरी ती कारकुनांची निर्मिती करणारी असली, जन्माला आली. कुठल्याही समाजामध्ये राजकीय साक्षरता, अर्थ साक्षरता व सामाजिक साक्षरता निर्माण होण्यासाठी अक्षर साक्षरता आवश्यक असते. अक्षर साक्षरता ही सामाजिक विकासातील मूलभूत बाब आहे. भारतीयांना अक्षर साक्षरतेची ओळख झाली. 1872 साली ब्रिटिश भारतातील साक्षरतेचे प्रमाण अवघे 3.2% इतके होते. सध्या 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 81% साक्षरता आहे. अठराव्या शतकाच्या आरंभी भारतात सामाजिक सुधारणांसाठी जुन्या सरंजामी व्यवस्थेच्या तुलनेत पोषक परिस्थिती निर्माण झाली होती.
भारतात अद्याप ब्रिटनच्या राणीचे साम्राज्य स्थापन व्हायला अवकाश होता. राणीच्यावतीने ईस्ट इंडिया कंपनीच राज्यकारभार चालवत होती. प्राप्त परिस्थितीत कंपनी सरकारच्या दयेवर जगणे यातच इतिकर्तव्यता आहे याची जाणीव मोगल सत्तेला झाली होती. यातूनच कंपनी सरकारशी बोलणी करण्यासाठी दिल्ली सत्ताधीश अकबर दुसरा याने राजा राममोहन रॉय यांची नेमणूक केली. यावरून लक्षात येते की तत्कालीन समाजव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांमुळे आधुनिक शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते.
1) राजा राममोहन रॉय: (22 मे 1772 - 27 सप्टेंबर 1843) राममोहन रॉय यांनी हिंदू धर्मातील सर्वात अघोरी समजल्या जाणाऱ्या सतीप्रथे विरोधात सामाजिक जागृती केली. हिंदू धर्मातील बुरसटलेल्या आणि अन्याय्य रुढी परंपरांचा विरोध करताना 1828 झाली त्यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. या नावातच ब्राह्मण हा शब्द होता. मात्र तत्कालीन परिस्थितीत उच्चशिक्षित समाजघटक ब्राम्हणच होता. ब्राम्हो समाजाच्या स्थापनेनंतर अवघ्या एक वर्षात राममोहन रॉय यांच्या प्रयत्नातून गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी 1829 साली बंगाल प्रांतात सती विरोधी कायदा पास केला. पुढे 1861 साली राणी व्हिक्टोरियाने सतीप्रथेवर देशभरात बंदी घातली. सतीप्रथेबद्दल अनेक संवेदनशील भारतीयांमध्ये तिरस्काराची भावना होती मात्र या प्रथेला उघड विरोध राममोहन रॉय यांनी केला. कायद्याने संमत झालेले ही पहिली समाजसुधारणा होती.
अठराव्या शतकातील अनेक समाजसुधारकांनी हिंदू धर्मातील बुरसटलेल्या रूढी, घृणास्पद परंपरा, कर्मकांडे, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जाति व्यवस्था या विरोधात आवाज उठवला आणि सामूहिक सार्वत्रिक शिक्षण, विशेषतः महिला शिक्षण, विधवा पुनर्विवाह, स्री पुरुष समानता इत्यादी गोष्टींचा पुरस्कार केला. त्रयस्थपणे बघितले तर सुमारे दोनशे वर्षांपूर्वी त्यावेळच्या समाज सुधारकांनी मांडलेली मुल्ये आजच्या आधुनिक भारतातील कित्येकांच्या पचनी पडणार नाहीत.
• सन 1789: फ्रेंच राज्यक्रांतीला आरंभ झाला. याच वर्षी जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. जॉर्ज वॊशिंग्टन हे नाना फडणवीसांना समकालीन होते.
• सन 1801: इंग्लंडमध्ये जगातील पहिली जनगणना पार पडली.
• सन 1806: स्टेट बॅंक ऑफ इंडियाची मुळ बॅंक, बॅंक ऑफ कलकत्ताची स्थापना झाली. नंतर तीचे नाव बदलून बॅंक ऑफ बंगाल करण्यात आले. वास्तविक 1770 मध्ये कंपनी सरकारने बॅंक ऑफ हिंदुस्तान ची स्थापना केली होती. पण तीला लवकरच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर 1786 साली जनरल बॅंक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. थोडक्यात पेशवाईच्या मध्य काळात ब्रिटिशांनी भारतात बॅंकिंग व्यवहारास सुरवात केली होती.
• सन 1813: ब्रिटिश पार्लमेंटमधे ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर वादळी चर्चा झाली. हिंदुस्तान ब्रिटनचा आहे की ईस्ट इंडिया कंपनीचा? असा संतप्त प्रश्न पार्लमेंटमधे विचारण्यात आला.
• 17 नोव्हेंबर 1817: शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. पेशवाईचा अस्त झाला.
2) बाळशास्त्री जांभेकर: (6 जानेवारी 1812 - 18 मे 1846) यांनी मराठी पत्रकारितेचा आरंभ केला. प्रिंट मीडियाची ताकद त्यांनी ओळखली. समाज जागृतीसाठी वृत्तपत्र हे माध्यम त्यांना आवडले आणि अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा आरंभ केला. या वृत्तपत्राचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. या अंकाच्या पानांवर दोन कॉलम असत व त्यातील एक कॉलम मराठीत व दुसरा कॉलम इंग्रजी भाषेत असे. मात्र त्या काळाच्या तुलनेत या वृत्तपत्राची किंमत एक रुपया इतकी भारी भक्कम होती. हे वृत्तपत्र 1840 पर्यंत सुमारे आठ वर्षे त्यांनी चालवले. या वृत्तपत्रातून मुख्यत्वे विधवा विवाह आणि अशिक्षित भारतीयांना शास्त्रीय दृष्टिकोन प्रदान करण्याचे काम केले जात होते. देश केवळ शास्त्रीय ज्ञान आणि पुरोगामी दृष्टिकोनाच्या आधारावरच पुढे जाऊ शकतो असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. तसेच नेटिव्ह इम्प्रोवमेंट सोसायटीची स्थापना केली. 1840 साली त्यांनी मराठी मासिक 'दिग्दर्शन' हे सुरू केले व ते 1845 पर्यंत सुमारे पाच वर्ष चालविले. त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, इतिहास अशा अनेक विषयांवर लिखाण केले. त्यांना मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, गुजराथी, बंगाली इत्यादी भाषा अवगत होत्या. एशियाटिक सोसायटी मध्ये संशोधनपर निबंध छापून आलेले ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली छापील प्रत त्यांनी 1845 साली प्रकाशित केली. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
3) सर सय्यद अहमद खान: (17 ऑक्टोबर 1817 - 27 मार्च 1898) सर सय्यद हे प्रागतिक मुस्लीम तत्त्वज्ञ होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात लघुवाद न्यायालयात जज होते. 1857 च्या युद्धाच्या वेळी ते ब्रिटिशांच्या सोबत होते. मुस्लिम समाज त्याच्या बुरसटलेल्या कर्मठ रूढी-परंपरा मुळे मागास राहिला आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी पाश्चिमात्य पद्धतीच्या शास्त्रीय सामुहिक शिक्षणाचा पुरस्कार केला. 1859 साली त्यांनी मुरादाबाद येथे गुलशन शाळेची स्थापना केली व गाझीपुर येथे व्हिक्टोरिया शाळेची स्थापना केली. 1864 साली त्यांनी मुस्लिम सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. ही संस्था साधारण ब्राम्हो समाजाच्या धर्तीवर होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी त्यांचे तीव्र मतभेद होते. 24 मे 1875 रोजी व्हिक्टोरिया राणीच्या जन्मदिनी त्यांनी अलिगड स्कूल सुरू केले 1877 मध्ये त्याचा विस्तार होऊन मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज निर्माण झाले. 1887 साली बद्रुद्दिन तय्यबजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा सर सय्यद यांनी काँग्रेसबद्दल तीव्र शब्दात रोष व्यक्त केला. त्यांच्या मते ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी हिंदू आणि मुस्लीम यांची एकजूट करणे हे मुस्लिमांसाठी घातक ठरेल कारण शिक्षण, सामाजिक सुधारणा, राजकीय जागृती व लोकसंख्येच्या पायावर मुस्लीम हे हिंदूंपेक्षा खूप मागास आहेत. त्यांचे अनुयायी राहिलेले मुस्लिम समाज सुधारक मोहम्मद शफी आणि शाह दिन यांनी लाहोर येथे 1866 झाली अंजुमन- ए- हिमायत- ए- इस्लाम ही संस्था स्थापन केली व पाश्चिमात्य शिक्षणाचा पुरस्कार केला तसेच मुस्लिम महिला शिक्षणावर भर दिला.
4) तत्वज्ञ कार्ल मार्क्स: (5 मे 1818 - 14 मार्च 1883) जर्मन तत्वज्ञ असलेल्या कार्ल हेंरिच मार्क्स यांना 65 वर्षे आयुष्यमान लाभले. मार्क्सवाद यांच्या नावाने ओळखला जातो. जर्मनीत टिएर येथे जन्म झाला. त्यांच्या क्रांतिकारी राजकीय भूमिकेमुळे मार्क्स यांना अनेकदा परागंदा व्हावे लागे. अखेरीस ते लंडन येथे वास्तव्यास आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 1848 साली त्यांनी कम्युनिस्ट जाहिरनामा प्रसिद्ध केला. कम्युनिस्ट जाहिरनामा हे आजही सर्वाहारावर्गाचे मुख्य घोषणापत्र म्हणून ओळखले जाते. 1867 ते 1883 या दरम्यान त्यांनी दास कॅपिटल चे तीन ग्रंथ लिहिले पैकी एक ग्रंथ त्यांच्या कारकीर्दीत प्रसिद्ध करता आला.
5) दादोबा पांडुरंग तर्खडकर: (9 मे 1819 ते 17 ऑक्टोबर 1882) दादोबा आणि आत्माराम पांडुरंग हे दोघे बंधू होते. मात्र त्यांनी आपले तरखडकर हे आडनाव लावले नाही. मराठी व्याकरणामध्ये तरखडकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 1867 झाली त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांनी हिंदू धर्मातील कर्मकांडे जातीप्रथा यांना विरोध केला आणि विधवा पुनर्विवाह, शिक्षण व महिलांचे शिक्षण यांचा पुरस्कार केला.
6) ईश्वरचंद्र विद्यासागर बंडोपाध्याय: (26 सप्टेंबर 1820 - 29 जुलै 1891) यांचा जन्म बंगालमध्ये हुगळी येथे झाला. विधवांच्या पुनर्विवाहासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलेले कार्य सर्वांना परिचित आहे. लॉर्ड डलहौसीने अमलात आणलेला 1856 सालचा विधवा पुनर्विवाह कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यामुळे संमत झाला. त्या काळातील विधवांचे जीवन अत्यंत दुर्धर होते. त्यांचे केशवपन केले जाई, त्यांना पांढऱ्या वस्रात राहावे लागे, अनेकदा त्या लैंगिक शोषणाला देखील बळी पडत व अशावेळी त्यांना मृत्यूला कवटाळावे लागे. या विधवांचा पुनर्विवाह धर्म संमत नसल्याने होत नव्हता. राम मोहन रॉय यांनी विधवांच्या सतीप्रथेला विरोध करणारा कायदा ब्रिटिशांकडून संमत करून घेतला तर ईश्वरचंद्र यांनी विधवांना पुनर्विवाह करण्याचा हक्क मान्य करून घेतला. ईश्वरचंद्र विद्यासागर हे संस्कृतमध्ये उच्चविद्याविभूषित होते. त्यांची आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांची प्रथम भेट झाली तेव्हा इश्वरचंद्र यांच्या विद्वत्तेने भारावून जाऊन स्वामीजींनी सांगितले की ईश्वरचंद्र हे विद्येचा सागर आहेत. येथूनच पुढे त्यांना विद्यासागर या नावाने ओळखले जाऊ लागले.
7) फ्रेडरिक एंगल्स: (28 नोव्हेंबर 1820 - 5 ऑगस्ट 1895) एंगल्स हे कार्ल मार्क्स यांचे सहकारी होते व मार्क्स इतकेच प्रतिभावंत होते. दोन तत्त्वज्ञाची अशी मैत्री इतिहासाने आजवर पाहिली नाही. एंगल्स यांचा जन्म जर्मनीत झाला. दास कॅपिटलला मार्क्स इतकेच एंगल्स यांचेही योगदान आहे. मार्क्सच्या मृत्यूनंतर दास कॅपिटलचा दुसरा व तिसरा खंड एंगल्स यांनी संपादित केला. त्यांचा कुटुंब संस्था शासन संस्था व खाजगी मालमत्ता या नावाचा ग्रंथ आजही प्रमाण समजला जातो.
• सन 1830: लॉर्ड मेकॉले याने हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतासाठी स्वतंत्र फौजदारी कायदा (Indian Penal Code) करण्याची मागणी केली.
8) गोपाळ हरी देशमुख ऊर्फ रावबहाद्दूर ऊर्फ लोकहितवादी: (18 फेब्रुवारी 1823 - 9ऑक्टोबर 1892) लोकहितवादी यांच जन्म पुणे येथे झाला. त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरु केले. या साप्ताहिकातून त्यांनी बालविवाह, हुंडाप्रथा, बहुपत्नीत्व, जातीप्रथा आणि कर्मकांड याविरोधात आवाज उठवला.
9) आत्माराम पांडुरंग तर्खडकर (1823 - 26 एप्रिल 1898) दादोबा आणि आत्माराम पांडुरंग या दोघाही बंधूंनी सामाजिक सुधारणेच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 15 सप्टेंबर 1883 रोजी स्थापन झालेल्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS या NGO च्या स्थापनेमधे आत्माराम तर्खडकर हे संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
10) स्वामी दयानंद सरस्वती: (12 फेब्रुवारी 1824 ते 30 ऑक्टोबर 1883) दयानंद सरस्वती भारतीय तत्त्वज्ञ होते. त्यांचे पूर्ण नाव मुल शंकर तिवारी असे होते. त्यांचा जन्म गुजरात मध्ये मोरबी जिल्ह्यात टंकारा या छोट्या गावात झाला. त्यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाज हा वेदिक हिंदू धर्मामध्ये सामाजिक सुधारणा करणारा समाज होता. राम मोहन रॉय यांचा ब्राम्हो समाज, दादोबा तर्खडकरांचा प्रार्थना समाज, दयानंदांचा आर्य समाज हे हिंदू धर्मांतर्गत सामाजीक सुधारणा साध्य करू इच्छिणारे समाज संघटन होते. भारतीय स्वराज्याची प्रथम घोषणा दयानंद सरस्वती यांनी केली. 'स्वराज्य' ही घोषणा नंतर लोकमान्य टिळकांनी स्वीकारली. स्वामीजी हे ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधात पहिला नारा देणारे भारतीय होते.
11) महात्मा ज्योतिबा फुले: (11 एप्रिल 1827 - 28 नोव्हेंबर 1890) ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे शिक्षण ख्रिश्चन मिशनरी स्कूलमधून झाले होते. अठराव्या शतकातील पहिल्या पाच दशकातील सुधारकांपेक्षा फुल्यांचा मार्ग व त्यांचे कार्य मूलतः वेगळे आहे. आजवरचे सर्व समाजसुधारक हे उच्चवर्णीय होते व बहुतेक सर्व ब्राह्मण या जातीत जन्माला आले होते. ज्योतीबा फुले हे माळी या शूद्र जातीमध्ये जन्माला आले होते. महात्मा फुले यांनी ब्रिटिश साम्राज्यशाही, भारतीय सरंजामशाही आणि सनातनी जातिप्रथा व कर्मकांडे या तिघांनाही विरोध केला. सामूहिक शिक्षण, विधवांचे पुनर्विवाह, मुलींचे शिक्षण, जातीप्रथा निर्मूलन, समानता या बद्दलचे त्यांचे विचार व कार्य सर्वश्रुत आहे. त्यांच्या समकालीन असणाऱ्या उच्चवर्णिय समाज सुधारकांप्रमाणे त्यांचा हिंदू धर्मातील सुधारकी बदलांवर विश्वास नव्हता. त्यांच्या मते हिंदू धर्मात प्रागतिक - उदारमतवादी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वेळ आणि शक्तीचा अपव्यय आहे.
यापूर्वी स्थापना झालेले ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज हे हिंदू धर्मात प्रागतिक व उदारमतवादी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करित होते. परंतु या सर्वाला छेद देत समानता आणि शास्त्रीय पुरोगामीत्व याच्या पायावर महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून हिंदू धर्मातील सनातनी रुढी - परंपरा - कर्मकांडे - ब्राम्हण्य यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी ब्राम्हण्यवादावर कठोर टीका करणारा गुलामगिरी हा ग्रंथ 1873 साली प्रकाशित केला व तो अमेरिकेतील निग्रोंच्याद्वारे चालविल्या जाणाऱ्या चळवळीला अर्पण केला. फुल्यांनी त्यांच्या या एका कृतीतून शोषितांबद्दल असलेली आंतरराष्ट्रीय बंधुभावाची संकल्पना, त्या काळात भारतीय समाज जीवनातील रूढ असलेल्या पुरोगामी क्रांतिकारी वैचारीक पातळीच्या पलीकडे नेली. 1881 साली शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून त्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाही आणि सरंजामशाही दोघांवरही प्रचंड टीका केली. शेतकऱ्यांच्या दुर्दशेला ब्रिटिश आणि ब्राह्मणशाही हे दोघेही कारणीभूत आहेत असे त्यांनी मांडले.
फुले हे केवळ बैठकी समाज सुधारक नव्हते. पुण्यातील सनातन्यांचा संपूर्णपणे विरोध पत्करून त्यांनी 3 जुलै 1851 रोजी भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. स्वतःच्या घराशेजारी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पाणवठा उभारून त्यांनी सनातन्यांचा रोष ओढवून घेतला. कुमारी माता व विधवांची बाळंतपणे त्यांनी, पत्नी सावित्रीबाई यांच्या साहाय्याने स्वतःच्या घरात केली. फुले दांपत्याला मुल नव्हते, पण म्हणून त्यावेळच्या रितीप्रमाणे दुसरा विवाह न करता फुल्यांनी यशवंत या मुलाला दत्तक घेतले.
फुल्यांनी त्यांच्याच काळातील ब्राह्मण सुधारकांनी चालवलेली समाजसुधारणेची चळवळ कशी फोल आहे हे दाखवून दिले. त्यामुळे त्यांचे त्यांच्याच काळातील ब्राह्मण समाज सुधारकां सोबत मतभेद झाले. त्यांचे विष्णुशास्त्री चिपळूणकरांसोबतचे मतभेद हे जगजाहीर आहेत. विष्णुशास्त्री यांनी फुल्यांच्या भूमिकेचे खंडन केले. तत्कालीन ब्राह्मण समाज सुधारकांची वैचारिक मांडणी ही आर्यवंश श्रेष्ठ या गृहीतकावर आधारित होती. त्यामुळे आर्यवंशाचे समाज हे मूलतः अनार्यांपेक्षा सामाजिक व सांस्कृतिक पातळीवर श्रेष्ठ आहेत अशी मानसिकता तत्कालीन उच्चवर्णीय समाजसुधारकांची होती. फुल्यांनी या भूमिकेवर आघात केला. आधुनिक DNA संशोधनाने हे सिद्ध केले आहे की भारतीय उपखंडातील लोकांचे कुठल्याही प्रकारे युरोप व जर्मनीतील 'आर्यन' वंशाशी प्रचलित अर्थाने अनुवंशिक नाते नाही. तसेच संपूर्ण मानव प्रजातीची उत्पत्ती ही आफ्रिकेतील मानवापासुन झाली आहे.
12) लिओ टॉलस्टॉय: (9 सप्टेंबर 1828 - 20 नोव्हेंबर 1910) त्यांचे रशियन नाव लेव निकोलाविइच टॉल्स्टॉय असे होते. आजवरच्या सर्वोच्च लेखकांमध्ये त्यांची गणना होते. त्यांना नोबेल पुरस्कारासाठी अनेकदा नामनिर्देशित करण्यात आले परंतु त्यांना एकदाही नोबेल पारितोषिक मिळू शकले नाही. एका तालेवार रशियन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 1869 साली त्यांनी लिहिलेली वॉर अँड पीस ही कादंबरी आजही प्रसिद्ध आहे.
• सन 1833: ब्रिटिश पार्लमेंटमधे भारतासाठी चार्टर ॲक्ट पास झाला. याद्वारे ब्रिटिशांना भारतासाठी कायदे बनविण्याचा अधिकार मिळाला.
• इंग्लिश एज्युकेशन ॲक्ट 1935: लॉर्ड बेंटिंगच्या सूचनेनुसार कौन्सिल ऑफ इंडियाने हा कायदा मंजूर केला. या कायद्याद्वारे इंग्रजी ही राज्यकारभार, न्यायदान, आणि शिक्षणाची अधिकृत भाषा झाली. या कायद्यानुसार संस्कृत आणि पर्शियन या दोन्ही पारंपारिक भाषांना संमती नाकारली गेली. थॉमस बॅबिंग्टन मेकॉले याने इंग्रजी भाषा हीच यापुढे भारतीय शिक्षणाचे माध्यम राहील असे मांडले व भारतीय शिक्षण व्यवस्था ही पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली.
13) सावित्रीबाई फुले: (3 जानेवारी 1831 - 10 मार्च 1897) भारतातील पहिल्या महिला शिक्षक, पहिल्या महिला समाज सुधारक, कवी. महात्मा फुल्यांनी त्यांना अक्षरओळख करून साक्षर केले. ज्योतिबा आणि सावित्रीबाई ही समाजसुधारकांमधील पहिली विवाहीत जोडी. मुलींना शिकवायला जाताना सावित्रीबाईंच्या अंगावर सनातन्यांकडून घाण उडवली जात असे त्यामुळे त्यांना कपड्यांचे दोन जोड न्यावे लागत इतका त्रास व अवहेलना त्यांनी सोसली.
कुठल्याही स्री करिता सामाजीक विरोधाला तोंड देण्यासाठी केवळ पतीचे नैतिक पाठबळ आणि साथ पुरेसे नसते तीची स्वतःची वैचारीक क्षमता अशा वादळाला तोंड देण्यासाठी सक्षम असावी लागते. सावित्रीबाईंचे सामाजीक कार्य ज्योतिबांची पत्नी म्हणून उदयास आले असले तरीही ज्या निडरपणे तत्कालीन प्रस्थापितांच्या बुरसटलेल्या प्रतिगामी व्यवस्थे विरोधात त्या उभ्या ठाकल्या त्यास तोड नाही.
आजच्या सुशिक्षित समाजातील कितीजण कुमारी मातांना स्विकारतील किंवा विधवा पुनर्विवाहास मान्यता देतील किंवा मुला इतकाच मुलीच्या शिक्षणावर खर्च करतील किंवा स्रीला विटाळ समजणार नाहीत किंवा परजातीतला जोडीदार स्विकारतील किंवा विधी कर्मकांड न करता घरातील सुखदुःखाची कार्ये पार पाडतील या प्रश्नांची उत्तरे देणे अवघड जाईल. फुले दांपत्याने हे पावणे दोनशे वर्षापूर्वी केले होते. आणि सावित्रीबाईंच्या योगदानाशिवाय फुले पूर्ण होत नाहीत.
14)रामकृष्ण परमहंस: (18 फेब्रुवारी 1836 - 16 ऑगस्ट 1886) यांचे मुळ नाव गदाधर चट्टोपाध्याय असे होते जन्माने बंगाली होते. स्वामी विवेकानंद त्यांना आपले गुरू मानत असत. त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली व रामकृष्ण मिशनद्वारे प्रागतिक मूल्यांचा स्वीकार केला. मॅक्स मुल्लरने परमहंसांबद्दल म्हटले आहे की, a Bhakta, a worshipper or lover of the deity, much more than a gyanni or a knower.
15) न्यायमूर्ती रानडे: (18 जानेवारी 1842 - 16 जानेवारी 1901) यांचे पूर्ण नाव महादेव गोविंद रानडे होते. प्रार्थनासमाजी होते. त्यांनी पुणे सार्वजनिक सभा आणि वेदशास्रोत्तेजक सभा यांच्या कार्याला हातभार लावला. 1861 साली त्यांनी विधवा विवाह असोसिएशन स्थापन केली. सामूहिक शिक्षण, महिला शिक्षण, विधवा पुनर्विवाह इत्यादी कार्यात ते सहभागी होते. मात्र त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी दुसरा विवाह विधवा स्रीशी न करता त्यांच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या अवघ्या दहा वर्षे वयाच्या रमाबाई यांच्याशी केला. त्यांच्या या निर्णयावर सुधारकांकडून टीका झाली होती. पहिल्या पत्नी पासून मुल नसल्याने त्यांनी दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. विधवा स्रीशी विवाह करून तीच्यापासुन संतती झाल्यास त्या संततीला समाज स्विकारणार नाही या भीतीपोटी घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांनी बालिका विवाह केला होता. मात्र या दुसऱ्या विवाहातुनही त्यांना संतती प्राप्ती झाली नाही. त्यावेळचे सामाजीक वास्तव किती दाहक होते याचा प्रत्यय यातून येतो.
16) बद्रुद्दिन तय्यबजी: (10 ऑक्टोबर 1844 - 19 ऑगस्ट 1906) बॅरिस्टर होऊन मुंबई हायकोर्टात वकिली करणारे ते पहिले वकील होते. त्यांचा जन्म बोहरा मुस्लिम समाजात झाला. त्यांचे वडील मुल्ला तय्यब्जी भाई मिया प्रागतिक विचारांचे होते. त्यांनी आपल्या सर्व सातही मुलांना उच्च शिक्षण दिले. बद्रुद्दिन तय्यबजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष होते व पहिले मुस्लीम अध्यक्ष होते. त्यांनी 1873 साली मुंबई महापालिकेचे सभासद म्हणून, 1875 साली मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून, 1882 साली मुंबई कायदे मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले. सर फिरोजशहा मेहता आणि केसरीनाथ त्र्यंबक तेलंग यांच्यासह त्यांनी 1885 झाली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असताना 1887 - 88 या काळात त्यांनी सुधारणावादी मुस्लिमांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी इस्लाम क्लब आणि इस्लाम जिमखान्याची स्थापना केली. सर सय्यद यांनी काँग्रेसवर मुस्लीमांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन केले तेव्हा बद्रुद्दिन तय्यबजी यांनी मुस्लिमांना काँग्रेससोबत येण्याचे आवाहन केले. 1895 साली तय्यब्जी यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. असे पद मिळवणारे ते तिसरे भारतीय व पहिले मुस्लिम व्यक्ती होते. 1902 साली ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले.
• कम्युनिस्ट मॅनिफेस्टो फेब्रुवारी 1848: सर्वाहारावर्गाचे घोषणापत्र असून मार्क्स व एंगल्स या द्वयीने याचा मसुदा बनवला व तो कम्युनिस्ट लीगने स्वीकारला. जगातील सर्वात प्रभावशाली दस्तऐवज म्हणून ओळखला जातो.
• सन 1850 कार्ल मार्क्सच्या नोंदी: इंग्लंडच्या एकूण निर्यातीपैकी 12.5 % निर्यात भारतात होते. 1780 साली हीच निर्यात केवळ 3.12 % इतकी होती.
• सन 1853: आशियात मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे सुरू झाली. भारतात आधुनिक यंत्र कामगार वर्गाचा उदय झाला.
• सन 1854: मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली.
• सन 1856: ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली आणि टेलिफोन केंद्राची सुरुवात केली व महसूल वाढवला याचा लॉर्ड डलहौसीने जोरदार डंका पिटला.
• हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 28 जुलै 1856 : लॉर्ड डलहौसीने या कायद्याचा मसुदा बनवला आणि लॉर्ड कॅनिंगच्या काळात हा कायदा पास झाला. सतीप्रथा बंदीनंतर हिंदू समाजामध्ये केलेला हा दुसरा सुधारणावादी कायदा होता. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हा कायदा बनवण्यासाठी चळवळ केली होती. त्याकाळात विधवा स्त्रियांना कसलाही अधिकार नव्हता त्यांचे केशवपन केले जाईल व त्यांना फक्त पांढऱ्या वस्रामधे रहावे लागे. बालवयात विधवा झालेल्या मुलीला देखील पुनर्विवाह करायची बंदी होती. तत्कालीन महिलांची परिस्थिती खूपच वाईट होती.
• सन 1857 चा उठाव: दिनांक 26 फेब्रुवारी 1857 रोजी ब्रिटिशांच्या विरोधात मुर्शिदाबाद च्या जवळ बेहरामपुर येथे शिपायांनी बंड पुकारले. अठराशे सत्तावनच्या बंडाला सुरुवात झाली. या पाठोपाठ मेरठ, अंबाला, औंध, वायव्य प्रांत, लखनऊ, दिल्ली, फिरोजपुर येथेही बंडाचे वारे पसरले. 8 एप्रिल 1857 रोजी हुतात्मा मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. 10 मे 1857 रोजी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाला व्यापक सुरुवात झाली. हे युद्ध एक वर्ष चालले. 17 जून 1858 रोजी झाशीची राणी युद्धाच्या मैदानात धारातीर्थी पडली. तीला वीरमरण प्राप्त झाले.
• सन 1857: मुंबई व कलकत्ता या दोन विद्यापीठांची ब्रिटिशांनी स्थापना केली.
• 2 ऑगस्ट 1858: भारत ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला. लॉर्ड स्टॅनलेने मांडलेले हिंदुस्तान बिल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजूर झाले. महान हिंदुस्तान आता व्हिक्टोरिया राणीच्या साम्राज्याचा क्षुल्लक प्रांत बनला. भारत तिसऱ्या वेळी एकसत्तीय राजवटीखाली आला. प्रथम सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत नंतर अकबराच्या काळात आणि आता ब्रिटिश साम्राज्यसत्तेखाली.
• सन 1859: ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त केली. कंपनीवर भ्रष्टाचारापासून अनागोंदी पर्यंत अनेक आरोप झाले होते.
17) विष्णुशास्त्री चिपळूणकर: (20 मे 1850 - 17 मार्च 1882) विष्णुशास्त्रीना अवघे 32 वर्षे आयुष्य लाभले. कृष्णशास्त्री चिपळूणकर (1824 - 1878) हे त्यांचे वडील. बीए पर्यंतचे शिक्षण त्यांनी पुण्यात डेक्कन कॉलेजमधून घेतले. त्यानंतर सात वर्षे शाळा शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम केले. केसरीचे संस्थापक म्हणून टिळक आणि आगरकरांच्या सोबत ते देखील होते. मुलांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजावी म्हणून त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरु केले व शाळापत्रक हे नियतकालिक सुरू केले. विशेष म्हणजे त्यांनी आर्यभूषण छापखाना आणि चित्रशाळा छापखान्याची उभारणी केली. तसेच किताबखाना हे बुकसेंटर सुरु केले. तत्कालीन सर्वच सुधारकांप्रमाणे त्यांनीही सामूहिक शिक्षण, महिला शिक्षण, विधवाविवाह, हिंदू धर्माचे प्रागतिक पायावर पुनर्संघटन करणे इत्यादीचा पुरस्कार केला.
18) लोकमान्य टिळक: (23 एप्रिल 1856 - 1 ऑगस्ट 1920) लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक हे पहिले अखिल भारतीय नेते होते. टिळकांच्या ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी विचारांचा प्रभाव चित्पावन ब्राम्हणांसह देशभरातील अनेक ब्राम्हण व अब्राम्हणी लोकांवर पडला होता. टिळकांना समाजसुधारकांच्या रांगेत आणणे योग्य होणार नाही. कारण अनेक प्रसंगात टिळकांचे सुधारक मंडळींसोबत खटके उडत असत. यातील टिळक - आगरकर, टिळक - गोखले, टिळक - शाहू महाराज हे वाद महाराष्ट्राला परिचित आहेत. शारीरिक संबंधासाठी मुलीचे किमान वय (विवाहाचे वय नाही) कायद्याने (1891) निश्चित करण्यास टिळकांचा सक्त विरोध होता. त्यांच्या मते हे हिंदूमधील रितीरिवाजावर कायद्याचे अतिक्रमण आहे. मात्र असे असले तरीही टिळकांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेल्या विधवा विवाहाचे स्वागत केले होते. काहींच्या मते टिळकांचा सामाजीक सुधारणांना विरोध नव्हता तर अशा सुधारणा ब्रिटिशांनी कायदे करून आणण्यास विरोध होता. टिळकांची आणि विवेकानंदांची 1892 साली रेल्वेच्या प्रवासात पहिली भेट झाली होती. विवेकानंदांबद्दल त्यांना आदर होता आणि स्वामींच्या अकाली निधनानंतर त्यांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला होता.
लोकमान्य टिळकांच्या संदर्भात एक लक्षात येण्यासारखी बाब म्हणजे 1908 साली मंडालेच्या तुरुंगात जाण्यापूर्वी ते जसे कर्मठ होते तसे 1914 साली मंडालेतून परतल्यानंतर कर्मठ राहिले नाहीत. टिळक मंडालेतील कारावासातून बाहेर आले तोवर पहिल्या महायुद्धाला सुरवात झाली होती व ब्रिटिश सरकार अडचणीत सापडले होते. भारतीयांच्या मदतीची त्यांना गरज होती. त्यामुळे 1882 सालच्या सेलममधील पहिल्या हिंदू मुस्लिम दंगलीत हिंदूंची बाजू घेणाऱ्या टिळकांनी 31 डिसेंबर 1916 रोजी लखनौ करार करून मुस्लिमांना कॉंग्रेससोबत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एकत्र आणले आणि स्वातंत्र्याची चळवळ भक्कम केली. 1857 नंतर मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमधून पध्दतशीरपणे डावलणारी ब्रिटिश राजवट त्यांच्यासाठी राजकीय पातळीवर राखीवजागा ठेवायला उतावळी झाली होती. त्यांचा हा कुटील डाव लक्षात घेऊन टिळकांनी लखनौ करार केला. विशेष म्हणजे हिंदू महासभेच्या फेब्रुवारी 1915 मध्ये झालेल्या स्थापना अधिवेशनाला टिळक उपस्थित राहिले नाहीत. मात्र टिळकांच्या निर्वाणानंतर त्यांचे निकटचे सहकारी न. चिं. केळकर हे पुढे हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले. 1917 साली झालेल्या सोव्हिएत क्रांतीचे टिळकांनी स्वागत केले आणि रशियाचा महान नेता लेनिन या मथळ्याखाली केसरीमधे अग्रलेख लिहिला. टिळकांचे सुपुत्र श्रीधरराव (कै. जयंतराव टिळकांचे वडील) हे नंतर बाबासाहेब आंबेडकरांसोबत महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहातील संयोजकांपैकी एक होते. त्यांनी आपल्या भावासह गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांसाठी मेळा घेतला होता.
19) गोपाळ गणेश आगरकर: (14 जुलै 1856 - 17 जून 1895) आगरकर हे खऱ्या अर्थाने सुधारकी विचारांचे होते. आगरकर हे चित्पावन नव्हते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील होते. ज्या काळात सर्व सुधारक हे कोकणस्थांमधून येत होते त्यावेळी आगरकर हे देशस्थांमधून सुधारक बनले. प्रथम राजकीय परिवर्तन की प्रथम सुधारणा याबद्दल त्यांचा टिळकांशी वैचारिक मतभेद होता. आगरकरांचे म्हणणे होते की सामाजिक सुधारणा भारतासारख्या मागासलेल्या देशाला प्रथम आवश्यक आहेत, त्यानंतर राजकीय परिवर्तन घडवावे. टिळकांचे म्हणणे होते की प्रथम राजकीय परिवर्तन घडवण्यात यावे सामाजिक सुधारणा त्याच्या मागोमाग होतील.
वास्तविक आगरकर आणि टिळक हे एकत्र शिकलेले होते आणि वसतिगृहाच्या एका खोलीत राहणारे होते. केसरी या साप्ताहिकाची स्थापना (1881) टिळक, आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी केली. आगरकर केसरीचे पहिले संपादक होते. पुढे टिळकांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी केसरी सोडले. टिळक, आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांसह आपटे, नामजोशी, केळकर, गोळे, धारणे, महादेव बल्लाळ अशा सुधारकांनी एकत्र येऊन न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आगरकर, सुधारक या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते. तसेच फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. आगरकरांनी अस्पृश्यता निवारण, जातीप्रथा निर्मूलन, विधवाविवाह यावर सुधारक मधून लेख लिहिले. भूतकाळातील बुरसटलेल्या रूढी, प्रथा, परंपरा यांचे आंधळे अनुकरण करण्यास आगरकरांनी नकार दिला व त्यामध्ये बदल घडवून आणले पाहिजेत असे ठामपणे मांडले. आगरकरांना अल्पायुष्य लाभले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. केसरीचे दोन संस्थापक वयाच्या चाळिशीच्या आंत गेले.
20) महर्षी धोंडो केशव कर्वे: (18 एप्रिल 1858 - 9 नोव्हेंबर 1962) यांना 104 वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. स्वतः गणिताचे प्राध्यापक होते. महिला सक्षमीकरणासाठी महर्षी कर्वे यांनी पायाभूत कार्य केले. विधवांचे शिक्षण, विधवा विवाह यांचे ते पुरस्कर्ते होते. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी विधवेशी दुसरे लग्न केले. ब्राह्मणांमधील विधवा हा ब्राह्मण समाजाला मिळालेला मोठा शाप होता. ब्राह्मणांच्या विधवांनी संपूर्ण समाजाला जरी आग लावली तरी ती त्यांना क्षम्य आहे असे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते इतका ब्राह्मण विधवांवरील अन्याय हिडीस होता. टिळकांना देखील कर्व्यांच्या कार्याबद्दल आत्यंतिक आदर होता. 1958 झाली महर्षी कर्वेनी केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. महर्षी कर्वे यांचे मोठे चिरंजीव रघुनाथ कर्वे हे देखील त्यांच्या सारखेच पुरोगामी विचारांचे होते. रघुनाथराव कर्वे यांनी कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण यांचा भारतातआरंभ केला. 1921 साली लंडन मध्ये जेव्हा कुटुंब नियोजन करण्यासाठी पहिला दवाखाना उघडला गेला त्याच वर्षी रघुनाथराव कर्व्यांनी 1921 साली भारतात पहिला कुटुंब नियोजन दवाखाना सुरू केला.
21) पंडिता रमाबाई सरस्वती: (23 एप्रिल 1858 - 5 एप्रिल 1922) नाव रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे असे होते. मराठी भाषीक ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पंडिता हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी संस्कृतचे शिक्षण पूर्ण केले. 28 डिसेंबर 1885 रोजी झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या स्थापना अधिवेशनाला त्या उपस्थित होत्या. त्यांनी मुक्ती मिशन या संस्थेची स्थापना केली.
रमाबाईंचे आयुष्य हे दुःखाने भरलेले होते वयाच्या लहानपणीच अवघ्या सोळाव्या वर्षी आई-वडिलांचे छत्र गेल्याने त्यांना अनाथ म्हणून जीवन जगावे लागले. यावेळी त्या भारतभर फिरल्या. त्यांच्यासोबत त्यांचा धाकटा भाऊ श्रीनिवास हा होता. 1880 झाली त्यांनी बंगालमधील बिपिन बिहारी मेधवी या कायस्थ समाजातील वकीलाशी लग्न केले. याच वेळी त्यांचा प्राणप्रिय असलेला लहान भाऊ श्रीनिवास याचा अकाली मृत्यू झाला. रमाबाईंच्या या आंतरजातीय, आंतरराज्यीय व आंतरभाषिक विवाहास सनातन्यांनी प्रखर विरोध केला. कारण बिपीन बिहारी हे कायस्थ होते. या दोघांना मनोरमा नावाची मुलगी झाली. ही मुलगी देखील पुढे रमाबाईंप्रमाणेच अमेरिकेतून उच्चशिक्षण घेऊन आली आणि मुंबईत शारदासदन मध्ये प्रिन्सिपल म्हणून तिने तिचे कार्य केले. लग्नानंतर तीन वर्षातच बिपीन बिहारी यांचा मृत्यू झाल्याने रमाबाई पुन्हा पुण्यात आल्या आणि मुंबई हे त्यांनी त्यांचे कार्य क्षेत्र निवडले. त्यांनी महिला शिक्षणासाठी कार्य केले व आर्य महिला समाजाची स्थापना केली.
1882 साली ब्रिटिश सरकारने भारतीय शिक्षणाच्या परिस्थितीबद्दल लॉर्ड रिपन यांचे कमिशन नियुक्त केले होते. या कमिशनसमोर आपले म्हणणे मांडताना रमाबाईंनी तत्कालीन स्त्री शिक्षणाची दशा मांडली. त्यांनी मांडले की शंभर सुशिक्षित भारतीय पुरुषांपैकी 99 पुरुषांचा महिला शिक्षणाला विरोध आहे. त्यांनी पुढे मांडले की शिक्षक हा ट्रेंड टीचर असला पाहिजे तसेच मुलींच्या शाळांसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करावी व महिलांच्या आरोग्यासाठी महिला डॉक्टर नेमण्यात याव्यात. त्यांच्या या मांडणीची दखल खुद्द राणी व्हक्टोरिया ने घेतली होती. रमाबाईंनी 'हाय कास्ट हिंदू वुमन' हे पुस्तक लिहिले व ते भारतातील पहिल्या महिला डॉक्टर, आनंदीबाई जोशी यांना अर्पण केले. स्वामी विवेकानंद रमाबाईंना आपला आदर्श मानत असत. 1921 साली मुलगी मनोरमा हिच्या अवघ्या 40 व्या वर्षी झालेल्या अकाली मृत्यूमुळे त्या खचल्या होत्या. त्यानंतर अवघ्या नऊ महिन्यात त्यांचीही प्राणज्योत मालवली.
22) गुरुदेव रवींद्रनाथ टागोर: (7 मे 1861 - 7 ऑगस्ट 1941) त्यांचे नाव रवींद्रनाथ ठाकूर असे होते. कलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला. कवी, लेखक, संगीत रचनाकार, चित्रकला इत्यादी सर्व कलाविष्कारात त्यांचे मोठे योगदान आहे. गीतांजली हा काव्यसंग्रह त्यांनी लिहिला. 1913 साली टागोरांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. हे पारितोषिक मिळवणारे ते पहिले गौरेतर व्यक्ती होते.
23) मॅडम कामा: (24 सप्टेंबर 1861 - 13 ऑगस्ट 1936) मॅडम भिकाजी रुस्तम कामा या मूळच्या गुजरातमधील नवसारीच्या पण त्यांचे बालपण व कार्य मुंबईत झाले. त्यांचा जन्म श्रीमंत पारशी घराण्यात झाला होता. त्या उच्चविद्याविभूषित होत्या. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेल्या होमरूल सोसायटीच्या त्या संस्थापक सभासद होत्या. शामजी वर्मा, दादाभाई नवरोजी आणि एस. आर. राणा या तिघांनी होमरूल सोसायटीची 1905 साली स्थापना केली होती. होमरूल संघटना दोन होत्या. दुसरी संघटना लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी स्थापन केलेली 1916 सालची होमरूल लीग होती. पुढे बॅरिस्टर महमद अली जिन्हा यांनी लीग संघटनेची जबाबदारी सांभाळली व त्या नंतर महात्मा गांधींनी या संघटनेचे अध्यक्षपद भूषवलं.
22 ऑगस्ट 1960 रोजी जर्मनीत झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी अधिवेशनात मॅडम कामा यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाचा तत्कालिन नमुना फडकवला होता. मॅडम कामा यांनी स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे हक्क, मानवी हक्क, शिक्षण, भारताची स्वायत्तता इत्यादी मूल्यांचा पुरस्कार केला. सावरकरांच्या मार्सेलस बंदरावरील ऐतिहासिक उडीच्या प्रसंगी त्या फ्रान्समध्ये होत्या. त्यांनी सावरकरांना या कामी मदत केली असा ब्रिटिशांना संशय होता म्हणून ब्रिटिशांनी त्यांना ब्रिटनकडे प्रत्यार्पण करण्याची मागणी फ्रान्स सरकारकडे केली, पण फ्रान्सने ती फेटाळून लावली, त्यामुळे चिडलेल्या ब्रिटिशांनी मॅडम कामा यांची भारतातील संपत्ती जप्त करण्याची नोटीस काढली. सोव्हिएत क्रांतीचे प्रणेते कॉम्रेड लेनिन यांनी त्यावेळी मादाम कामा यांना रशियात स्थायिक होण्याची गळ घातली (तोवर रशियात क्रांती झाली नव्हती). पण कामा यांनी त्यास नकार दिला होता.
24) स्वामी विवेकानंद: (12 जानेवारी 1863 - 4 जुलै 1902) विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्र दत्त . त्यांना अवघे 39 वर्षांचे आयुष्यमान लाभले. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथे पार पडलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेले भाषण अनेकांना माहीत नाही. बऱ्याच जणांना त्यांनी बंधू-भगिनींनो हा शब्दप्रयोग या भाषणात वापरला होता इतकीच त्या भाषणाबद्दलची माहिती आहे. वस्तुस्थिती अशी आहे की विवेकानंद यांचे त्या वेळचे भाषण हे धर्म - जात - वंश इत्यादी बाजूला सारून शुद्ध मानवतावादाची कास धरणारे भाषण होते. या भाषणाची माहिती आजच्या परिस्थितीशी सुद्धा सुसंगत आहे.
या भाषणात त्यांनी सांगितले होते की, "सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेने बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकल आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचाराने भरून टाकल आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्ताने लाल केली आहे. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानव समाज आज कितीतरी विकसित झाला असता. मात्र आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे की ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता सर्व प्रकारच्या वेदना (मग त्या तलवारीने झालेल्या असोत की लेखणीने) आणि माणसा - माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल."
या भाषणात त्यांनी सांगितले होते की, "सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेने बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकल आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचाराने भरून टाकल आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्ताने लाल केली आहे. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानव समाज आज कितीतरी विकसित झाला असता. मात्र आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे की ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता सर्व प्रकारच्या वेदना (मग त्या तलवारीने झालेल्या असोत की लेखणीने) आणि माणसा - माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल."
स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, संत तुकडोजी महाराज, महाराष्ट्रातील संत परंपरा हे सर्वजण हिंदू होते पण त्यांनी दिलेला हिंदू धर्म हा वेगळा होता. तो प्रागतिक विचारांचा हिंदू धर्म होता. अन्य धर्माचा तिरस्कार करणारा हिंदू धर्म त्यांना अपेक्षीत नव्हता. विवेकानंदांनी एकदा सांगितले होते की मी समाजवादी नाही परंतु भाकरीच न मिळण्यापेक्षा तिचा चतकोर तुकडा केव्हाही चांगला.
25) रमाबाई रानडे: (25 जानेवारी 1863 - 25 जानेवारी 1824) रमाबाई महादेव रानडे या महिला हक्क कार्यकर्त्या होत्या. मराठीसह इंग्रजी आणि बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांचे न्यायमूर्ती रानडे यांच्याशी लग्न झाले. रानडे यांचा हा दुसरा विवाह होता. न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई यांनी सुखी व यशस्वी वैवाहिक जीवन व्यतीत केले. रमाबाईंनी 1880 साली हुजूरपागा येथे मुलींची शाळा काढली. आमच्या आयुष्यातील आठवणी हे आत्मचरित्र त्यांनी लिहून ठेवले आहे. आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या महिला. त्यांनी हिंदू महिला सोशल क्लबची स्थापना केली आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना भाषण करण्याचे शिक्षण दिले. त्या सेवासदन सोसायटीच्या अध्यक्ष होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी आर्य महिला समाजाची शाखा सुरू केली. त्या स्वतः प्रार्थनासमाजी होत्या. भारतीय महिला परिषद त्यांनी आयोजित केली. महिलांचे शिक्षण, महिलांसाठीचे कायदे, महिलांचे हक्क, लिंग समानता, राजकीय जागृती इत्यादी कार्य त्यांनी केले. महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेऊन नर्स होण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. सार्वत्रिक शास्त्रीय प्राथमिक शिक्षणाच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. रमाबाईंनी त्या काळातल्या रितीरिवाजानुसार पतीच्या निधनानंतर विधवेप्रमाणे आपले आयुष्य व्यतीत केले नाही.
26) डॉक्टर रखमाबाई रावूत: (22 नोव्हेंबर 1864 - 25 सप्टेंबर 1955) वसाहतीक भारतातील पहिल्या प्रॅक्टिस करणाऱ्या महिला डॉक्टर होत्या. त्यांचे सावत्रपिता सखाराम अर्जुन रावूत हे देखील डॉक्टर होते. रखमाबाई यांचे विशेष कार्य म्हणजे रखमाबाई अवघ्या अकरा वर्षाच्या असताना त्यांच्या झालेल्या विवाहाला, बालवधू विवाहाला त्यांनी आव्हान दिले होते. ही केस आजही भारतीय आणि ब्रिटिश कायद्याच्या इतिहासात महत्त्वाची केस म्हणून गणली जाते. कायदा विरुद्ध परंपरा, सामाजिक सुधारणा विरुद्ध रुढीप्रियता, स्त्रियांचे हक्क विरुद्ध धर्म परंपरा यावर भारत आणि इंग्लंड दोन्हीकडील उच्च न्यायालयात कायद्याचा कीस निघाला. स्वतः राणी व्हिक्टोरियाने या केसची दखल घेतली होती. या केसमधून पुढे 1891 चा शरीरसंबंधासाठी मुलींच्या किमान वयाचा कायदा निर्माण झाला. रखमाबाई प्रार्थनासमाजी होत्या व त्या आर्य महिला समाजाच्या कार्यात सक्रिय होत्या. रखमाबाईंच्या केस संदर्भात टिळकांनी विरोधी भूमिका घेतली होती व ब्रिटिशांनी हिंदू धर्म परंपरेमध्ये विनाकारण ढवळाढवळ करू नये असे मत मांडले होते. या केसचा अंतिम निकाल रखमाबाई यांच्या विरोधात गेला व कोर्टाने त्यांना नवऱ्याकडे परत जाऊन नांदण्यास सांगितले अन्यथा सहा महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा होईल असा निकाल दिला. यावेळी रखमाबाईंनी नवऱ्याकडे परत जाऊन स्वतःच्या शिक्षणाचे मातेरे करण्यापेक्षा तुरुंगवास भोगणे मान्य केले. या केसचे मॅक्समुल्लर ने वर्णन केले आहे की, न्यायालयीन मार्ग हे रमाबाईंच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते वास्तविक रखमाबाईना त्यांच्या शिक्षणानेच त्यांच्या स्वतःच्या निर्णयाचे न्यायदाते बनवले आहे. 1894 साली त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसीन ही पदवी घेतली. पुढे त्यांनी राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली. 1929 साली त्यांनी स्त्रियांसाठी पडदा या नावाने पत्र सुरू केले. तत्कालीन सामाजीक जीवनातील एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, 1904 साली झालेल्या त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर, पतीपासून विभक्त राहत असतानाही त्यांनी स्वतःसाठी विधवेप्रमाणे सफेद कपडे वापरणे पसंत केले.
27) नामदार गोपाळ कृष्ण गोखले: (9 मे 1866 - 19 फेब्रुवारी 1915) गोपाळ कृष्ण गोखले हे पहिले असे व्यक्ती होते जे समाज सुधारक आणि राजकीय नेते दोन्ही होते. महात्मा गांधी त्यांना आपले गुरु मानत असत आणि गोखले न्यायमूर्ती रानडे यांना आपले गुरू मानत असत. 1905 साली त्यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन केली. त्याकाळात मोठ्या संख्येने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या भारतीयांना अक्षरसाक्षर करणे व राजकीय साक्षरता प्रदान करणे हे सर्व्हंट्स ऑफ इंडीया सोसायटीचे उद्दिष्ट होते. याच वेळी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. त्यावेळी ते आपल्या राजकीय कारकीर्दीच्या उच्च शिखरावर होते. 1989 च्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला ते उपस्थित होते. भारताचे स्वशासन (स्वराज्य नव्हे) आणि सामाजिक सुधारणा या दोन्हींचा त्यांनी पुरस्कार केला. जॉन स्टुअर्ट मिल आणि एडमंड बर्क हे दोघे त्यांचे आदर्श होते. गोखलेना आधुनिक अर्थशास्त्र चांगले अवगत होते. गोखले स्वतः गणिताचे प्राध्यापक होते. टिळक - गोखले - चिपळूणकर - कर्वे असे अनेक समाजसुधारक त्या काळातील उच्च गणिताचे प्राध्यापक होते. गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये परतले तेव्हा भारत समजून घेण्यासाठी एक वर्ष भारतभ्रमण करा असा सल्ला गोखले यांनी गांधीजींना दिला होता. विशेष म्हणजे गोखले यांचा हा सल्ला महात्मा गांधींनी पूर्णपणे अमलात आणला व त्यांनी एक वर्ष कुठलेही राजकीय सामाजीक काम न करता संपूर्ण भारतभ्रमण केले. टिळक आणि गोखले यांच्यातील वादाचा परमोच्च बिंदू म्हणजे 1907 चे सुरत अधिवेशन होते. यावेळी स्टेजची तोडफोड, एकमेकांच्या अंगावर धाऊन जाणे, खुर्च्यांची फेकाफेक इत्यादी प्रकार घडले. कॉंग्रेसमधे दुफळी पडली ती कायमची, अगदी गांधीजीना देखील ती भरून काढता नाही आली. मात्र मृत्यूच्या अखेरपर्यंत कॉंग्रेसमधील ही दुफळी भरून यावी असे गोखलेंना वाटत होते. टिळक व गोखल्यांमध्ये तीव्र मतभेद असुनही टिळकांना गोखल्यांबद्दल आदर होता. त्यांच्या मृत्यू नंतर टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला होता.
• महिला बालहत्या प्रतिबंधक कायदा 1870: जन्मलेल्या बालिकेची हत्या करण्यापासून समाजाला प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. सध्याच्या स्त्रीभ्रूण हत्या कायद्यापेक्षा हा कायदा वेगळा होता.
28) महात्मा गांधी: (2 ऑक्टोबर 1869 - 30 जानेवारी 1948) मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधींनी काँग्रेस मधला मवाळ आणि जहाल गट एकत्र आणण्याचे काम केले. हे गट एकत्र आले परंतु हिंदुत्ववादी विचारसरणी ही शेवटपर्यंत कायम राहीली व त्याचे पर्यावसन पुढे भारत पाक फाळणीत झाले. काँग्रेसमधल्या मवाळ गटाचे बहुसंख्य पाठीराखे हे सुधारकांपैकी होते तर जहालांबरोबरच्या व्यक्ती सुधारकांना विरोध करून सनातनी विचारांची कास धरणाऱ्या होत्या. त्यामुळे या दोन्ही विचाराच्या लोकांना एकत्र आणणे कठीण काम होते आणि ते महात्मा गांधींनी साध्य केले. चळवळीच्या पातळीवर हे दोन्ही गट एकत्र आले पण विचारांच्या पातळीवर एक होऊ शकले नाहीत. महात्मा गांधीनी दक्षिण आफ्रिकेमध्ये 1893 ते 1914 या काळात वर्णद्वेषाच्या विरोधात सातत्याने चळवळ केली होती. या चळवळीमुळे भारतात येण्या अगोदर त्यांचे नाव जगभर गाजले होते. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून वयाच्या 45 व्या वर्षी भारतात परतले. गांधीजी गोखल्यांना आपले गुरु मानत. गोखले आणि टिळक यांच्यामधे तीव्र वैचारिक मतभेद होते. पण गांधीजींचा काँग्रेस मधला प्रवेश हा मात्र टिळक अध्यक्ष असताना त्यांच्या कारकिर्दीत आणि टिळक यांच्या पुढाकाराने झाला. अस्पृश्यता निवारण, जातीप्रथा निवारण, वैयक्तीक व सार्वजनिक स्वच्छता मोहीम इत्यादीबाबत महात्मा गांधींचे कार्य मोठे होते. मात्र त्याच बरोबर कॉंग्रेसमधल्या सनातनी वृत्तीच्या लोकांनाही त्यांनी आपल्या प्रार्थना व धर्म आचरणातून सोबत ठेवले.
गांधीजी आणि जिन्हा व सावरकर यांच्यातील महत्वाचा वैचारिक फरक असा की, गांधीजी हे वृत्तीने धार्मिक असूनही त्यांचे नाव सदैव सेक्युलर म्हणून घेतले जाते. कारण त्यांनी त्यांच्या राजकारणात धर्म आणला नाही. तर बॅरिस्टर महमद अली जीन्हा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोघेही नास्तिक होते पण त्यांचा विचार आणि राजकारण हे धर्मावर आधारीत होते. अनेकजण, नास्तिक व्यक्ती ही मूलतः सेक्युलर असते असे मानतात. पण हा ठोकताळा झाला नियम नाही. शासन संस्थेपासुन धर्मसंस्था अलग करणे ही युरोपियन धर्मनिरपेक्षतेची व्याख्या आहे, भारतात ती सर्वधर्मसमभाव या संकल्पनेनुसार वापरली जाते.
29) कॉम्रेड लेनिन: (22 एप्रिल 1870 - 21 जानेवारी 1924) व्लादिमिर इल्यिच उल्यानोव्ह हे सोविएत क्रांतीचे शिल्पकार व सोव्हिएत रशियाचे पहिले अध्यक्ष होते. त्यांना अवघे 54 वर्षे आयुष्यमान लाभले.
• सन 1875: दक्षिण भारतातील शेतकऱ्यांचा ब्रिटिश राजवटीच्या विरोधात उठाव. बंड मोडून काढण्यात आले. 1857 नंतर ब्रिटिश साम्राज्यवादी पिळवणूक तीव्र झाली. दबलेल्या जनतेचे उठाव वाढू लागले. 1881 साली फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिले.
• सन 1876: रॉयल टायट्ल्स ॲक्ट ब्रिटनने पास केला. राणी व्हिक्टोरिया भारताची महाराणी बनली.
30) विठ्ठल रामजी शिंदे: (23 एप्रिल 1873 - 2 जानेवारी 1944) विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात व पददलितांसाठी मोठे कार्य केले. ते प्रार्थनासमाजी होते व उच्चविद्याविभूषित होते. 1903 साली इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. 18 ऑक्टोबर 1906 रोजी त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. 1910 साली त्यांनी मुरळी प्रतिबंधक सभेची स्थापना केली. 1912 साली त्यांनी अस्पृश्यता निवारण परिषद घेतली. 1917 साली झालेल्या इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या अधिवेशनात त्यांना अस्पृश्यता निवारणा संबंधी ठराव मांडायची संधी देण्यात आली. हा ठराव कॉंग्रेस अधिवेशनात पास झाला. मात्र 1923 साली डिप्रेस्ड क्लास मिशनमधील पदाचा त्यांनी राजीनामा दिला. डिप्रेस्ड क्लास मिशनचा नेता हा अस्पृश्य समाजातील असावा अशी भूमिका पुढे आल्याने त्यांनी हा राजीनामा दिला व ते या संस्थेतुन बाहेर पडले. 1933 साली त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक प्रकाशित केले.
31) राजर्षी शाहू महाराज: (16जुन 1874 - 6 मे 1922) अवघे अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्यमान शाहू महाराजांना लाभले. पण या अल्पवयात त्यांनी केलेले कार्य अफाट आहे. त्यांनी विलायतेहून उच्चशिक्षण घेतले होते. त्यांचा मूळ पिंड हा राजा किंवा महाराजाचा नव्हता. आरंभी पासुन त्यांनी सर्वसामान्यांसाठी जनताभिमुख कारभार सुरू केला. पददलितांसाठी कार्य सुरू केले. ते महात्मा फुले यांना आदर्श मानत असत. स्वतः सत्यशोधक समाजाचे पाईक होते. शाहू महाराज यांच्या संदर्भात वेदोक्त ब्राह्मणांचा अधिकार ही घटना प्रसिद्ध आहे. ब्राह्मणांनी जेव्हा वेदोक्त विधी करण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी ब्राह्मणांच्या जागी बहुजन समाजातील व्यक्तीना क्षत्रिय जगद्गुरु हा दर्जा देउन त्यांची नियुक्ती केली. याच प्रकारे वंशपरंपरागतरित्या महसूल अधिकारी मिळणारे कुलकर्ण्यांचे अधिकार त्यांनी काढून घेतले. सर्वांना सामूहिक मोफत शिक्षण मिळाले पाहिजे या विचाराचे ते होते. त्यामुळे तत्कालीन सनातन्यांचा त्यांनी रोष ओढवून घेतला. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी केलेले कार्य भरीव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत 21 व 22 मार्च 1920 रोजी त्यांनी अस्पृश्यता विरोधी परिषद घेतली. तसेच आंबेडकरांनी 31 जानेवारी 1931 रोजी प्रकाशित केलेल्या मुकनायक पत्राला 2500 रुपयांची देणगी दिली होती. मराठा समाजासह सर्व पददलित समाजाला बहुजन या संज्ञाखाली एकत्र आणण्याचे काम शाहू महाराजांनी केले.
• 1880 महाराष्ट्रात ब्रिटिशांविरोधात उग्र शेतकरी बंड.
• 1881 महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक प्रसिद्ध केले.
• 1882 ते 1890 पर्यंत मुंबई व मद्रास प्रांतात कामगारांचे 65 संप झाले.
• 1884 एम. एन. लोखंडे या ज्योतिबा फुलेंच्या अनुयायाने मुंबईत पहिली कामगार सभा आयोजित केली. कामगार चळवळीला प्रारंभ झाला. कामगारांच्या मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला
• 1 मे 1886 जागतिक कामगार दिनाला सुरुवात झाली.
32) संत गाडगे महाराज: (23 फेब्रुवारी 1876 - 20 डिसेंबर 1956) त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंग्राजी असे होते. त्यांनी जातीभेद, प्राणिहत्या विरोध, स्वच्छता अभियान, पर्यावरणस्नेह, व्यसनाधिनता व अंधश्रद्धा निर्मूलन, कर्मकांडाला विरोध, सामूहिक शिक्षण इत्यादीचा पुरस्कार केला. गाडगेबाबा तीस वर्षे पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकीच्या वारीला गेले पण एकदाही विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले नाहीत किंवा आषाढी व कार्तिकीचा उपवास ठेवला नाही. ते हातात झाडू घेऊन चंद्रभागेच्या तीरावरील घाण साफ करत व आलेल्या यात्रेकरूंना स्वच्छतेवर कीर्तन देत असत. लोक संतांना आदर्श मानतात पण गाडगे महाराज, बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानत. आंबेडकर गेल्यावर अवघ्या 14 दिवसांनी तेही गेले.
33) बॅरिस्टर जीन्हा: (25 डिसेंबर 1876 - 11 सप्टेंबर 1948) बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्हा हे जन्माने पाकिस्तानातील कराचीचे पण त्यांची व्यावसायिक कर्मभूमी ही मुंबई राहिली होती. मुंबई हायकोर्टात त्यांनी प्रॅक्टिस केली. इंडियन मुस्लिम लीग, होमरूल लीग यांचे ते नेते होते. 1916 साली झालेल्या लखनऊ करारावर टिळकांसह जिन्हा यांची देखील सही आहे. जिन्हा हे वैयक्तीक जीवनात अधार्मिक होते मात्र त्यांचे संपूर्ण राजकारण हे धर्माधिष्ठित होते.
34) रामास्वामी पेरियार: (17 सप्टेंबर 1879 - 24 डिसेंबर 1973) इरोड वेंकटप्पा रामस्वामी यांना थंथाई पेरियार असे संबोधले जात असे. 94 वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. द्रविड चळवळीचे ते अर्धव्यु होते. त्यांनी द्रविड कळघमची स्थापना केली आणि आत्मसन्मान ही चळवळ सुरू केली. त्यांनी ब्राम्हणी वर्चस्ववाद आणि जातिभेद व लिंगभेदा विरोधात कार्य केले. पेरियार यांनी 1919 साली काँग्रेसचे सभासदत्व स्वीकारले होते. पण 1925 साली त्यांनी हे सदस्यत्व सोडले. काँग्रेस केवळ ब्राम्हणांसाठी काम करते असा त्यांचा आरोप होता. पेरियार आणि आंबेडकर हे दोघेही मोठे दलित नेते गांधीजींच्या हयातीत काँग्रेसपासून दूर गेले. तर भगतसिंग हे कधीच कॉंग्रेसचे सभासद नव्हते. 1939 मध्ये त्यांनी स्वतःचा न्यायपक्ष या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. 1944 साली या पक्षाचे नाव त्यांनी द्रविड कळघम असे ठेवले. पुढे 1944 साली या पक्षातून अण्णादुराई वेगळे झाले व त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम ची स्थापना केली.
• इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना: (28 डिसेंबर 1885) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई येथे 72 प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाली. याचे संस्थापक सर ॲलन ऑक्टाव्हीन ह्यूम हे होते. सुशिक्षीत भारतीयांना चर्चा करण्याचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आयएनसी ची स्थापना करण्यात आली होती. 1857 नंतर ईस्ट इंडिया कंपनी कडून भारताची सत्ता ब्रिटिश सरकारकडे आली होती. या अधिवेशनाला व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मनमोहन घोष, लाल मोहन घोष, बद्रुद्दिन तय्यबजी, महादेव गोविंद रानडे, दादाभाई नवरोजी, दिनशा वाचा, सर फिरोजशहा मेहता इत्यादी उपस्थित होते.
35) स्वातंत्र्यवीर सावरकर: (28 मे 1883 - 26 फेब्रुवारी 1966) विनायक दामोदर सावरकर यांचे कार्य मुख्यतः एकोणिसाव्या शतकातील आहे. मात्र अठराव्या शतकात झालेल्या सामाजिक व राजकीय या सुधारणांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. सावरकर हे नास्तिक विचारांचे होते परंतु त्यांचे संपूर्ण राजकारण हे धर्माधिष्ठित होते. आज जे सावरकरांना ओळखलं जातं ते सावरकर 1911 पूर्वीचे आहेत. वैज्ञानिक विचारांचे, देवधर्म सर्व थोतांड समजणारे, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे कट्टर विरोधक, सशस्त्र क्रांतिकारकांच्या फळीतील अशी प्रतिमा सावरकरांची दाखवली जाते ही 1911 साली अंदमानच्या तुरुंगवासात जाण्यापूर्वीची आहे. 1924 साली तुरुंगातून सुटल्यानंतरचे सावरकर हे पूर्ण वेगळे आहेत. ते नंतर हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले व जिन्हांच्या मुस्लिम लीग सोबत त्यांनी काही काळ आघाडी केली होती. सावरकरांना उर्दू भाषा चांगली येत होती व त्यांनी उर्दूमध्ये रचनादेखील केल्या आहेत.
भारताची फाळणी टाळणे शक्य होते पण फाळणीची बीजे अठराव्या शतकाच्या अखेरीस दिसू लागली होती. एकेकाळी दिल्लीचा सत्ताधीश असलेला मुस्लिम उमराववर्ग व एकूणच मुस्लिम समाज शंभर वर्षात मागास बनला होता व हा ब्रिटिशसत्तेने कुशलतेने आखलेल्या डावपेचाचा भाग होता आणि त्याला तोंड देण्यासाठी हिन्दू मुस्लिम ऐक्य हाच उपाय होता व ते जाणून टिळकांनी 1916 चा लखनौ करार केला होता.
36) कर्मवीर भाऊराव पाटील: (22 सप्टेंबर 1887 - 9 मे 1959) कर्मवीर भाऊराव पाटलांचे कार्य हे 19 व्या शतकातील आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. फुले आणि शाहू महाराजांना आदर्श मानत असत. सामूहिक व सार्वत्रिक शिक्षणाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. कमवा आणि शिका या योजनेचे ते मूळ प्रवर्तक आहेत. शैक्षणिक संस्था चालविण्यासाठी शासनाकडून अनुदान घेण्यास महात्मा गांधींचा सक्त विरोध होता. गांधीजींचे म्हणणे होते शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय शिक्षणाची शिकवण द्यावी व त्यांना निरपेक्षपणे विचार करण्यास शिकवावे. सरकारकडून अनुदान घेतले तर शिक्षणसंस्था सरकारच्या मिंध्या होतील आणि विद्यार्थ्यांना यथार्थ ज्ञान प्राप्त होणार नाही. याउलट भाऊराव पाटलांचे म्हणणे होते की, संस्था चालविण्यासाठी पैसा उभारावा लागणार आणि तो शासनाकडून अनुदानाच्या मार्गाने घेण्यास काही हरकत नाही. आजच्या खाजगी अनुदानित शिक्षण संस्था हे भाऊराव पाटलांनी घेतलेल्या त्या वेळेच्या भूमिकेचे फळ आहे.
• एज ऑफ कन्सेंट ॲक्ट 1891: शरीरसंबंध संमतीसाठी मुलींच्या किमान वयाचा कायदा. 1887 साली फुलमणी दासी या अकरा वर्षीय बंगाली बालवधूचा तिच्या 35 वर्षीय पतीसोबत झालेल्या शारीरिक संबंधामुळे मृत्यू झाला होता. या मृत्यूमुळे लहान वयात मुलींची लग्न लावून त्यांना सक्तीचा शरीरसंबंध करण्यास भाग पाडण्या विरोधात जनमत जागृत होऊ लागले होते. त्यावेळी हा कायदा जन्माला आला. हा कायदा जन्माला येण्यामागे रखमाबाई रावूत यांनी हायकोर्टात चालवलेली बालवधूला नवऱ्याच्या घरात न नांदण्याचा अधिकार असला पाहिजे ही केस देखील कारणीभूत होती. या कायद्याला सुधारकांचा पाठिंबा होता तर टिळकांचा कट्टर विरोध होता. टिळकांच्या मते हिंदूंना ज्या काही सामाजिक सुधारणा करायची असतील त्या हिंदू स्वतः करतील ब्रिटिशांनी आपले कायदे आणि नियम लागू करून हिंदू धर्मामध्ये ढवळाढवळ करू नये.
37) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर: (14 एप्रिल 1891 - 6 डिसेंबर 1956) भीमराव रामजी आंबेडकर. आंबेडकरांचे मुख्यकार्य एकोणिसाव्या शतकातील आहे. मात्र अठराव्या शतकातील सामाजिक सुधारणांचा प्रभाव त्यांच्यावरही पडला होता.
भारतासारख्या बहुविविधतेचे व सांस्कृतिक विविधतेचे देणे लाभून नटलेल्या देशाला एकत्र येण्यासाठी विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींना सोबत घेणे गरजेचे होते. सामाजिक, सांस्कृतिक, भाषीक, धार्मिक, भौगोलिक, नैसर्गिक विविधता असलेला भारत जगात एकमेव देश आहे. विविधतेत एकता हे भारताचे सौंदर्य आहे. मात्र आजकाल हे सौंदर्य अनेकांच्या डोळ्यांना खुपू लागले आहे. 1857 नंतर अस्पृश्य समाज हळूहळू शिक्षणाकडे वळू लागला. महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज व अनेक समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे बहुजन समाजापर्यंत शिक्षणाचे वारे वाहू लागले. शिक्षण जरी तळागाळात पोचले तरी मनातला जातिभेद बाहेर पडला नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा इत्यादीमध्ये डॉक्टरेट घेतलेल्या अस्पृश्य समाजातील व्यक्तीबद्दल सनातनच्या मनात तीव्र आकस होता. कारण बहुजनांची निरक्षरता हेच त्यांच्या संपन्नतेचे साधन होते. अस्पृश्यतेचा प्रश्न तीव्र बनला होता. अस्पृश्य समाज शिक्षणात हळूहळू पुढे येत होता. 1925 सालच्या पुणे करारानंतर आंबेडकरांना राष्ट्रीय पातळीवरील नेता म्हणून ख्याती मिळाली. पुढे आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून भारतीय स्वातंत्र्य चळवळीने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडली.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांबद्दल एक गैरसमजूत अशी पसरवली जाते की, हे तिघेही ब्राह्मण विरोधक होते. वस्तुस्थिती अशी आहे की, या तिघांचेही अनेक सहकारी हे ब्राह्मण समाजात जन्माला आलेले होते. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहातील आंबेडकरचे अनेक सहकारी हे ब्राह्मण समाजातील होते. या तिघांनीही ब्राह्मण व्यक्तीला विरोध केलेला नाही तर ब्राह्मणवादाला विरोध केलेला आहे. अस्पृश्यता, जातिभेद, सनातन रूढी, बुरसटलेल्या परंपरा, कर्मकांडे, आर्थिक व सामाजिक शोषण याला विरोध केला आहे.
भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात अठराव्या शतकातील राजकीय व सामाजिक सुधारणांच्या कार्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तीन प्रांतातील वेगवेगळ्या धर्माचे तरुण एकत्र फासावर गेले. आजही लाहोरमध्ये शहिदांना फाशी दिलेले ठिकाण साम्राज्यशाही विरोधी लढ्याची स्मृती म्हणून जतन केले आहे. दरवर्षी हजारो लोक या स्मृतीस्थळाला भेट देतात. तेथील युवा विद्यार्थी चळवळीला हे स्थळ आजही प्रेरणादायी वाटते. भारताचे राजकीय स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अशा अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे फळ आहे. त्यावर अधिकार सर्व भारतीयांचा आहे.
सोमवार दिनांक 13 जुलै 2020
संदर्भसूची:
1 भारतातील मुसलमानांचा राजकीय इतिहास 1858 ते 1947
रामगोपाल
2 भारत आजचा आणि उद्याचा
रजनी पाम दत्त
3 भारताचा इतिहास: कालक्रमानुसार टीपा
कार्ल मार्क्स
4 Dynamics of Cultural Revolution: 19th Century Maharashtra
J. R. Shinde
5 गुलामगिरी
महात्मा ज्योतिबा फुले
6 संकेतस्थळ Wikipedia / Internet
7 डॉ. सदानंद मोरे, डॉ. रावसाहेब कसबे भाषणे, यूट्यूब
Comments
Post a Comment