रयतेचा राजा शिवाजी राजा

रयतेचा राजा शिवाजी राजा 

 (1630 - 1680) 

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची मोहिनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आहे. असे काय कारण होते की ज्यामुळे या देशांत अनेक राजे, महाराजे, सम्राट, शहेनशहा होऊन गेले परंतू शिवाजीराजांबद्दलची आपुलकी व आदर आज 340 वर्षानंतरही जनतेच्या मनात कायम टिकून आहे. शिवाजी महाराजांचे आयुष्य अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. त्या घटनांबद्दल सर्वच जण भारावून बोलतात. परंतू त्या घटनांची जंत्री सांगणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा जीवनपट उलगडणे असे नव्हे. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, पन्हाळगडाच्या वेढ्यातून योजनाबद्ध धाडसाने निसटणे, आग्राच्या कैदेतून शिताफीने सुटका, कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला माते समान मानणे, महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडणे इत्यादी काही घटनांच्या आधारे शिवाजी महाराजांची थोरवी गायली जाते. शिवाजीराजांना अवघे 50 वर्षांचे आयुष्य लाभले त्यांतील वरील प्रमुख घटनांचा कालखंड तपासला तर सर्व घटना 1657 ते 1666 या साधारण 10 वर्षांच्या काळात घडलेल्या आहेत. मात्र त्यांचा थोरपणा या पलीकडचा आहे. महात्मा फुलेंनी शिवाजीचे वर्णन रयतेचा राजा असे केले आहे. शिवाजी जून्या सरंजामी काळातील राजा होता परंतू तो रयतेचा राजा होता आणि म. फुल्यांच्या याच रयतेचा राजा या शब्दात शिवाजीराजांचे थोरपण सामावले आहे. जून्या शालेय पुस्तकात लिहिलेला छत्रपतींचा इतिहास म्हणजे हिंदू-मुस्लीम संघर्षाचा इतिहास असल्याचे बिंबवले जात होते. मात्र त्या काळातील वस्तुस्थिती तपासली तर तसे अजीबात आढळत नाही. 


जेम्स मील या स्कॉटिश अर्थतज्ञ व राजकीय विश्लेषकाने 1817 साली भारतीय इतिहासाची हिंदू इतिहास, मुस्लिम इतिहास आणि ब्रिटिश इतिहास अशा तीन खंडामधे विभागणी केली व त्याचे तीन स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित केले. त्याच्या मांडणीनुसार हिंदू कालखंड हा भारताच्या भरभराटीचा काळ होता. मुस्लिम कालखंडात भारताची सर्व पातळीवर पीछेहाट झाली. आणि आधुनिक ब्रिटिश काळ हा भारताला पुन्हा नवचैतन्य देण्याचा काळ आहे. जेम्स मिलचे भारताबद्दलचे हे विश्लेषण अशास्त्रीय आहे. युरोपकेंद्रीत जगाच्या संकल्पनेवर आधारीत ही मांडणी होती. अनेक भारतीय इतिहासकारांनी पुराव्यानिशी मांडले की, जेम्स मिलने केलेली भारतीय इतिहासाची मांडणी ही अनैतिहासिक आहे, ब्रिटिशांचा उदोउदो करून हिंदू-मुस्लिम तेढ वाढवण्यासाठी या इतिहास लेखनाचा उपयोग केला जात आहे. पण अगदी स्वतंत्र भारतात सुद्धा जेम्स मिलने केलेल्या ऐतिहासिक तथ्यांच्या तोडफोडीवर आधारित इतिहासच क्रमिक पुस्तकातून शिकवला गेला. कुळवाडी भूषण रयतेचा राजा हे महात्मा फुल्यांनी दिलेले विशेषण लयाला जाऊन त्याऐवजी हिंदूपदपातशहा हे नवे विशेषण तयार झाले. वास्तविक शिवाजीराजाना केवळ हिंदूराजा असे संबोधणे हे त्यांच्या महान कर्तुत्वाला कोतेपणा आणते. 


 शिवाजीराजांच्या बाजूने अनेक मुस्लिम लढले तर विरोधात अनेक हिंदूही लढले आहेत. महाराजांना औरंगजेबाच्या हवाली करणारे मिझाराजे जयसींग हे राजपूत हिंदू होते त्यामुळे हिंदू विरुद्ध मुस्लीम असा हा संघर्ष नव्हता. हा संघर्ष जून्या सरंजामी व्यवस्थे विरोधात नव्याने उदयाला येणाच्या बीजरूपातील भांडवलशाहीचा संघर्ष होता. शिवाजीराजांचे द्रष्टेपण यांत होते की त्यांनी या बीजरुपातील भांडवलशाहीची पावले ओळखली होती. जुन्या सरणाऱ्या व्यवस्थेच्या तुलनेत ही नवी व्यवस्था अधिक आधुनिक व अधिक पुरोगामी होती. 


शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची आर्थिक, सामाजीक व राजकीय परिस्थिती आणि तंत्रवैज्ञानिक प्रगती: 


 1498 साली वास्को-दी-गामा याने केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालीकतच्या किनाऱ्यावर नांगर टाकल्यानंतर 1530 साली म्हणजे शिवाजीच्या जन्माच्या 110 वर्षे अगोदर पोर्तुगीज भारतात आले होते व त्यांनी मुंबई, गोवा, अर्नाळा, वसई, तारापूर, दिव या ठिकाणी आपले बस्तान बसवीले होते, ठाणे येथील तलावपाळीसह अनेक ठिकाणी चर्च स्थापन केली होती. नंतरच्या काळात डचांनी 1595 पर्यंत कलकत्तात वखारी उभ्या केल्या होत्या. इंग्लंडमध्ये राणीला सल्ला देणाऱ्या उमरावांच्या मंत्रीमंडळाऐवजी त्याच उमरावांच्या प्रातिनिधिक सभेची, संसदेची स्थापना झाली होती. कोपर्नकिसने 15 व्या शतकात पृथ्वी केंद्रीत जगाची कल्पना फेटाळून लावली होती आणि गॅलीलीओने धर्ममार्तंडाना आव्हान देऊन पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे ठामपणे मांडले होते. टेलीस्कोपचा शोध लागला होता व अकबराच्या काळात युरोपातून दुर्बीण आली होती. जोहान्स केप्लरने पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते हे गणिती समीकरणांच्या सहाय्याने सिद्ध केले होते. गणितात लॉगरिथम व लॉगरीथमीक स्केलचा वापर होऊ लागला होता. 16 व्या शतकाच्या आरंभी लंडन इस्ट इंडिया कंपनीची सरकारी रोखे धेऊन स्थापना झाली व त्यांची जहाजे 1601 मध्ये भारतात येऊन पोचली होती. स्थिर विद्युतची माहीती झाली होती व त्याचे रुपांतर करंट इलेक्ट्रीसीटी मध्ये कसे करता येईल यावर खल चालू होता. 


इस्ट इंडीया कंपनीच्या मद्रास, सूरत व बंगाल मध्ये कारखाने सदृश्य वखारी होत्या. भारतात भांडवलदारी श्रम विभागणी उदयास येत होती. गोव्यामधे जेसुइट मिशनऱ्यांनी 1556 साली छापखाना सुरु केला व त्यावर पहिले पुस्तक येशूची शिकवण हे छापले गेले होते. इंग्रजी भाषा आत्मसात केलेला एखाददुसरा एतद्देशीय जसा निर्माण झाला होता तसाच देशी भाषा जाणणारा युरोपीअन देखील होता. व्यापारासाठी जग हळूहळू जवळ येत होते. भारतात इराण, इराक, अफगाणिस्तान, उज्बेकिस्तान, रशीया, चीन, सिंगापूर, श्रीलंका, मलेशिया इत्यादी देशांना भेट देणारे लोक होते. आजच्या भाषेत ते सर्व फॉरीन रिटर्न होते. जवळच्या चीनमध्येही भांडवलशाहीचा प्रसार झाला होता. चीनच्या लोकसंख्येपैकी दीड लाख लोकं ख्रिश्चन धर्मीय होते. चीनमधील वांग फू या तत्त्वज्ञाने भौतिकवादी कास धरली होती. इंग्लंडमध्ये आरंभीच्या कापड गिरण्या जन्माला येण्याचा तो काळ होता. आयझॅक न्यूटन व शिवाजी समकालीन होते. गणित, कॅलक्युलस, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचा सुंदर मिलाफ होऊन मानवी समाज नव्या प्रगतीकडे आगेकूच करण्याच्या बेतात होता. अशा या काळात शिवाजीराजांचा जन्म झाला होता. 


 जागतीक परिस्थितीपासून भारत अलीप्त नव्हता मात्र भारतावर या प्रगतीचे ठसे अद्याप उमटायचे होते. जून्या व्यवस्थेला आव्हान देणारी नवी व्यवस्था उदयाला येत होती. ही नव्याने उदयाला येणारी बीजरुपातील भांडवलशाही छत्रपती शिवाजी व शहेनशहा औरंगजेब या दोघांनाही त्यांच्या हयातीत पहायला मिळाली. या नव्या व्यवस्थेतील अनेक पुरोगामी मुल्ये शिवाजीराजांच्या राज्यकारभारात आढळतात. शेतकऱ्याला राजाच्या गरजेनुसार नव्हे तर त्या शेतकऱ्याच्या शेतातील पिकाच्या उत्पन्नानुसार शेतसारा ठरवून देणे ही आधूनिक प्रागतिक अर्थशास्रीय मुल्यांशी सुसंगती राखणारी कार्यपद्धती शिवाजीराजांनी अंमलात आणली. धर्मसत्तेने राजकारणात हस्तक्षेप करु नये असे आजची आधुनिक लोकशाही धर्मनिरपेक्षता सांगते परंतू शिवाजीचा काळ हा राजसत्तेने धर्मकारणात हस्तक्षेप न करण्याचा होता, अशा वेळेस आपला मेव्हणा बजाजीचे हिंदू धर्मात पूनश्च धर्मांतर करवून घेणे आणि पूर्व सेनापती नेताजी पालकर याचेही पून्हा हिंदू धर्मात धर्मांतर करवून घेणे या बाबी धर्मवादी दृष्टीकोनातू तपासणे चूकीचे आहे. तत्कालीन सर्व धर्ममार्तंडांचा प्रखर रोष पत्करुन महाराजांनी ही धर्मांतरे घडवून आणली होती व धर्माच्या नावाखाली धर्ममार्तंडांनी चालवलेल्या कालबाह्य रुढींना फाटा दिला होता. याला धार्मिक लांगुलचालन म्हणता येणार नाही. उलट धर्माच्या नावाखाली चाललेल्या अधर्माला दिलेला तो त्या काळच्या परिस्थितीतील धक्का होता. धर्म आचरणाचे स्वातंत्र्य वैयक्तीक आहे हेच त्यांनी या कृतीतुन दाखवून दिले. 


औरंगजेबाला लिहिलेले जिझिया कराच्या विरोधातील त्यांचे पत्र याचाच पूनश्च परिचय देते. इथे मूद्दा जिझिया हा कर हिंदूंवर लादला की मुसलमानांवर लादला असा नव्हता तर राज्यकारभार करताना जनतेच्या पारंपारीक हिताचे संरक्षण करणे व राज्यशकट जनतेसाठी हाकावयाचा आहे याचे भान राजसत्तेने ठेवले पाहीजे असा आहे. डिझास्टर मॅनेजमेंट हा आजच्या व्यवस्थापन शास्त्राचा आवडता शब्द आहे. राजांनी पावसाळ्यामध्ये किल्लावर एखादी आपत्ती अथवा अपघात होऊन किल्ला व किल्लातील सैन्य आणि जनतेची हानी किंवा नूकसान होऊ नये यासाठी बारीक सारीक बारकाव्यांसह सर्व किल्लेदारांना पत्र पाठवीले होते. हे पत्र व्यवस्थापनातील एक आदर्श वस्तूपाठ आहे. शेतकऱ्याच्या, मग तो कुठलाही शेतकरी असो, त्याच्या शेतातील उभ्या पिकाला हात लावण्यास सक्त मनाई करणारा शिवाजीचा आदेश त्या काळाच्या तूलनेत, आधूनीक अन्न सुरक्षा कशी असावी याचा आदर्श होता. पर्यावरण रक्षण ही संज्ञा ज्या काळाला माहिती नव्हती त्या काळात, "आंब्याची अथवा फणसाची झाडे घरे बांधण्यासाठी उपयोगात येतील मात्र एकदा तोडली की पुढे एकदोन वर्षात मिळणार नाहीत इतकी जाण रयतेने ठेवावी. जंगलातील सागवानाची झाडे परवानगी घेऊन तोडावी. पूर्वजांनी अंगणातील झाडे लेकरांप्रमाणे वाढवली असून शक्यतोवर त्यास हात लावू नका." इतक्या स्पष्ट शब्दात महाराजांनी वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगितले आहे. 


 शिवाजी राजांच्या हयातीत 1653 साली ताजमहाल बांधून पूर्ण झाला. त्या काळातील राजे महाराजांच्या विलासी रहाणीचे अनेक राजवाडे व राजप्रासाद आजही साक्ष देत उभे आहेत. 1664 सालच्या सुरतेच्या लूटीतून ताजमहाल इतकाच एखादा भव्य प्रासाद शिवाजी महाराज स्वतः साठीही बांधू शकले असते. परंतु शिवाजी म्हटला की आठवतात ते फक्त किल्ले. किल्ले व कोठारे ही त्या काळातील एक योग्य भांडवाली गुंतवणूक होती. आलेला पैसा निरर्थक विलासासाठी खर्च करण्याऐवजी नवी मुल्यवाढ करणाऱ्या दुसऱ्या भांडवली गुंतवणूकीसाठी वापरावा हा आजच्या भांडवली अर्थशास्त्राचा सिध्दांत शिवाजीराजानी त्यावेळी आत्मसात केला होता. शिवाजी व औरंगजेब हे दोघेही विलासी राहणीसाठी कधीच प्रसिद्ध नव्हते. भारतातील सर्वच राजांचे स्वतःचे सैन्य होते. घोडदळ, पायदळ, हत्तीदळ, तोफखाना सर्व होते. काहींची व्यापारी जहाजे देखील होती पण अत्याधूनिक आरमार स्थापण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न जसा शिवाजीने केला तसा अन्य कुणी केला नाही. भारतातील निजामशाही, आदिलशाहीसह सर्व राजे अगदी राजपूत राजेही दिल्ली तख्ताला सम्राट समजत असत, स्वत: औरंगजेब इराणच्या बादशहाला आपला सम्राट समजत असे. 


औरंगजेबाचे राज्य अफगाणिस्तान पासून आसाम पर्यत पसरलेले होते. अशा काळात स्वत:चा गागाभट्टांमार्फत राज्याभिषेक (सन 1674) करून स्वतःला सम्राट म्हणून घोषीत करणे ही त्यावेळच्या परिस्थितीतील अभूतपूर्व घटना होती. शुद्रांच्या राजाला राज्याभिषेक करता येणार नाही हा धर्ममार्तंडांचा अधिकार डावलून त्यांनी हा राज्याभिषेक केला व दिल्लीला समांतर सरकार रायगडावर आहे हे आसेतुहिमाचल दाखवून दिले. ज्ञानेश्वर माऊलीनी संस्कृत ऐवजी मऱ्हाठी मधून ज्ञानेश्वरी लिहून प्रस्थापित व्यवस्थेला जो तडाखा दिला तसाच तडाखा शिवाजीराजांच्या राज्यभिषेकामूळे बसला. राजा सर्वसत्ताधीश असला तरी त्याने सल्लागार मंडळाच्या सल्लानूसार काम करावे ही नवी व आधुनिक लोकशाहीशी सदृष्य असणारी संकल्पना आहे. शिवाजीराजे सत्तेत सर्वोच्च स्थानी असले तरिही त्यांच्या अष्टप्रधान मंडळालाही त्यांच्याच तोडीचे स्थान राज्यकारभार चालविताना लाभले होते. न्यायव्यवस्था ही राजसत्तेपासून स्वायत्त असली पाहीजे ही नव्या लोकशाही मुल्यांवर आधारीत संकल्पना आहे. पेशवाईतील रामशास्त्रींचे नाव त्यासाठी घेतले जाते. रामशास्त्रीबाणा हा शब्दप्रयोग त्यातून निर्माण झाला. न्याययंत्रणेच्या अख्यत्यारीत राजेपदही येते या संकल्पनेची बीजे त्यांच्या राज्यकारभारात आढळतात. 



शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची जागतीकपटलावरील परिस्थिती: 


शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या दहा वर्षात दिल्लीचे तख्त खिळखिळे झाले. तिजोरी रिकामी झाली होती. राजांच्या निधनानंतर मराठे 30 वर्षे लढले. इसवीसन 1700 ते 1800 चा कालखंड हा मराठ्यांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. दिल्लीच्या तख्तावर कुणी बसायचे हे मराठे ठरवू लागले. संताजी व धनाजीने एकचालकानूवर्ती दिल्लीचे सरकार हादरवून सोडले. पराक्रमी आणि चतूर मराठी राजा असे खुद्द कार्ल मार्क्सने शिवाजीचे वर्णन केले आहे. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 14 वर्षांनी बँक ऑफ इंग्लंडची स्थापना झाली. जोनाथन कॉफी हाऊस येथे प्रारंभीक शेअर मार्केट तयार झाले. जॉइंट स्टॉक कंपन्या, गव्हर्मेंट बोर्ड, बोर्ड ऑफ डायरेक्टर इत्यादी बाबी शिवाजीच्या हयातीतच रुजल्या होत्या. शिवाजीराजांची निकोल्स या युरोपीअन व्यक्ती सोबतची भेट त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. भारतातील सतीप्रथे सारख्या प्रतिगामी परंपरे विरोधात आवाज उठविणाऱ्या राजा राममोहन रॉय यांचा जन्म छत्रपतींच्या मृत्यूनंतर 94 वर्षांनी झाला. शिवाजीराजांच्या मृत्यूला एक शतक पूर्ण होते तेवढ्यातच फ्रेंच राज्यक्रांती, व्हिग क्रांती, इंग्लंड मधील कामगार चळवळी मार्फत निघालेले हजारोंचे मोर्चे, चिनमधील कामगार व शेतकऱ्यांची बंडे, नाना फडणवीस यांचे समकालीन असणारे जॉर्ज वॉशींग्टन यांची अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होणे इत्यादी सामाजीक घडामोडी वेगाने घडून आल्या. दुसऱ्या बाजूने कापड उद्योगाचा विकास झाला, फ्लायशटल नंतर आलेली रोलर स्पिनींग कापड मिल, मद्रास कोर्टाची स्थापना, हारग्रीव्हजने शोधलेले कापूस पिंजण्याचे यंत्र, कार्टराईटचे वॉटर फ्रेम यंत्र, क्रॉम्प्टनचे म्यूल नावाचे कापणी यंत्र, इत्यादी शोधांचे शोधकर्ते शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर 50 ते 100 वर्षांच्या काळात होऊन गेले. 17 वे शतक हे जगातील औद्योगीक शोधांचे शतक होते व त्या शोधांची पायाबरणी 16 व्या शतकात घातली गेली. या सर्वापासून शिवाजी राजे अलीप्त असणे शक्य नव्हते.  


शिवाजी राजे हे संरजामी राजवटी मधील राजे असले तरी त्यांच्या काळाच्या तुलनेत त्यांनी धारण केलेली मूल्ये नव्याने उदयास येणाऱ्या भांडवली व्यवस्थेशी सुसंगत व पूरोगामी होती. शिवाजीराजे हे आजच्या युगातील कामगार - शेतकरी व मध्यमवर्गाचे समाज पुरुष शोभतील. म्हणूनच ते रयतेचे राजे होते, आम जनतेचे राजे होते.


संज्योत राऊत 
शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021

Comments

Popular Posts